ग्रामपंचायत निवडणूक राड्याची बातमी केल्याच्या रागातून पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला, पत्रकार संघटना आक्रमक

दौंड : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ग्रामपंचायत राड्याची बातमी केल्यानंतर त्या जुन्या बातमीचा राग मनात धरून लोकशाही न्यूज चॅनेलचे पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर पाच ते सहा जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना पाटस (ता.दौंड) येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विनोद गायकवाड हे त्यांच्या भावकीतील लग्नसमारंभ आटोपून लग्न मंडपातून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वार झाला असून त्यांच्या छाती व दंडावरहि जबर मारहाणीच्या खुना दिसत आहेत.

याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पत्रकार संरक्षण कायदा तसेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाअंतर्गत आरोपिंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे. आरोपिंवर कठोर कारवाई न झाल्यास पत्रकार संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पत्रकारांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही, आरोपिंवर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे यांनी केली आहे.

बातम्या करतो म्हणून अपघाताचा बनाव करून नुकतीच एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. आज पुन्हा एकदा जुन्या बातमीच्या रागातून पत्रकारावर भर लग्न समारंभात हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आरोपिंवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास पत्रकार संघटना आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.