- अब्बास शेख
दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक निकाल समोर आला आणि प्रत्येकाने आपापल्या परीने या निकालाची समीक्षा करत पराभव, विजय याबाबत आपले मत जाहीर केले.
मात्र हा निकाल लागण्यामागे यातील मुख्य कारण हे राऊतांची सभा किंवा राष्ट्रवादी कुठे कमी पडली हे नसून यातील मुख्य कारण हे ‘लालसा’ असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या बोलण्यातूनहि हिच बाब समोर येऊ लागली असल्याने आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.हाच अनुभव कुल गटाच्याही पाठीशी असून यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत.
सध्या दौंड तालुक्यात दोन प्रबळ पक्ष असले तरी यात मुख्य दोनच तुल्यबळ गट आहेत. त्यापैकी एक ‘कुल’ आणि दुसरा ‘थोरात’ गट. या दोन गटांमध्येच कायम राजकीय रस्सीखेच पहायला मिळते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावरून संपूर्ण तालुक्यात वादंग उठले आहे. तसेच वादंग मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवरून उठले होते. मागील झेड.पी, पंचायत समिती निवडणुकीत ‘कुल’ गटाचा मोठा पराभव झाला होता तर ‘थोरात’ गटाला मात्र एक जागा वगळता घवघवीत यश मिळाले होते. कुल गटाच्या पराभवाचे मुख्य कारण हे ‘मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी’ आणि मग इर्षेने पेटून आतून मदत करून विरोधकाला निवडून आणण्यासाठी केलेला खटाटोप… असा निष्कर्ष काढण्यात आला होता.
विशेष बाब म्हणजे केवळ पद आणि सत्तेसाठी अनेकवेळा कुल-थोरात गटात जाऊन किंवा छुप्या पद्धतीने विरोधकांशी हात मिळवणी करून वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या महाभागांची एक वेगळीच यादी आहे.
सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तोच प्रकार झाला असल्याचे समोर येत असून याला खुद्द राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते दुजोरा देताना दिसत कहेत. ‘सवतीसाठी नवरा मारण्याचा’ प्रयोग येथेहि झाला असून ना राऊत ना, राष्ट्रवादी ना, ना आप्पा, ना दादा… तर केवळ स्वार्थ, अप्पलपोटेपणा आणि ‘मी’ आणि कायम ‘मीच’ या इर्षेने हे सर्व घडून आले असल्याचे कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब केले जात आहे. ‘मला नाही’ तर ‘मग तुलाही नाही’ या इर्षेने पेटलेल्यांनी आपले कौशल्य या निवडणुकीतही दाखवून दिल्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात होत आहे. दोन्ही बाजूनी वर्षानुवर्षे पदे, सत्ता भोगूनही पदाची भूक कमी होण्याऐवजी वाढतच जात असल्याने हे प्रकार आता सामान्य होताना दिसतात. पक्ष, नेत्यावरील निष्ठा याची जागा आता स्वार्थ आणि मतलबीपणाने घेतली असल्याचे पहायला मिळत आहे. दोन्हीकडील पक्षाने, नेत्याने कितीही मदत केली, पदे दिली, जनतेने विश्वास ठेऊन अनेकवेळा संधी दिली तरी केवळ एकदा थांबण्यास सांगितले की लगेच स्वार्थी प्रवृत्ती जागी होऊन जनता आणि नेत्यांचे उपकार विसरून त्यांना धोका दिला जातो आणि हा अनुभव कुलांनाही आहे आणि थोरतांनाही…
2014 साली तालुक्यातील अनेक विकासकामे करूनही थोरातांना पराभव स्विकारावा लागला होता तर संपूर्ण तालुका विकासमय करण्याच्या इर्षेने पेटून कुलांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून त्यांनाही 2019 साली केवळ सातशेच्या आसपास निसटता विजय मिळाला होता. यावरून ‘घर का भेदी, लंका ढाये’ या वाक्याचा अर्थ या नेत्यांनाही चांगलाच माहित झाला आहे. एखाद्या गाव पुढाऱ्याला, कार्यकर्त्याला वर्षानुवर्षे संधी देऊनहि फक्त एकदा संधी नाकारली की यांनी आपले खरे रुप दाखवत पक्ष, नेत्याशी गद्दारी केलीच म्हणून समजा… याचा पक्का अनुभव आता जनतेलाही आला आहे. नाकापेक्षा मोती जड नको म्हणून मग स्वतःच्या गटातील उमेदवाराला पाडण्यासाठी विरोधी गट, उमेदवाराशी हातमिळवणी करणे, विरोधी उमेदवाराला कधी छुपी तर कधी उघडपणे मदत करणे, विविध लालसेच्या आहारी जाऊन जनतेच्या मताशी प्रतारणा करणे, जनमत एकीकडे आणि राजकीय खेळी एकीकडे असले प्रकार आता राजरोसपणे होताना दिसतात.
वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय वैराचा पुरेपूर फायदा गाव पुढारी उचलताना दिसतात आणि ऐनवेळी आपल्याच नेत्याला धोका देऊन त्याचे खापर दुरुसऱ्याच्या माथीही फोडण्याची मोठी कला या पुढाऱ्यांनी आत्मसात केलेली दिसते. त्यामुळे नेत्यांनीही आपला हा कार्यकर्ता खूप कट्टर आहे, तो आपल्याला धोका देणार नाही या अतिविश्वासातून बाहेर पडण्याची गरज असून जर त्यांची परीक्षाच घ्यायची असेल तर एकदा तिकीट नाकारून पहावे म्हणजे ‘दूध का दूध’ आणि ‘पाणी का पाणी’ होऊन जाते. वर्षानुवर्षे पदाला चिटकून बसलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवून नव्या उमेदीची तरुण फळी निर्माण करण्याची गरज आहे आणि प्रत्येक होतकरू आणि विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असणाऱ्या युवकांना राजकारणात संधी देण्याचीही गरज आहे तरच या जुन्या खोडांची मक्तेदारी संपुष्टात येऊन वर्षानुवर्षे गाव, शहर आपल्या ताब्यात ठेवण्याची मानसिकता आणि त्यासाठी काहीही करण्याची लालसा खऱ्या अर्थाने मोडीत काढता येईल.
टीप – वरील बातमी अथवा यातील कोणताही मजकूर कॉपीपेस्ट करुन स्वतःच्या बातमीत घेऊ नये/कॉपीपेस्ट करु नये. अन्यथा कॉपीराईट कलमांतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.