अब्बास शेख / अख्तर काझी
दौंड : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत असून याचा निकाल उद्याच जाहीर होणार आहे. दौंड तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी मोठी चूरस या निवडणुकीत पहायला मिळत आहे. दोन्हीकडील नेते मंडळी आपलाच विजय होणार असल्याचा दावा करीत आहेत.
सहकारातील या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर पॅनल टाकून उभे ठाकले आहेत.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 साठी आज सकाळी 8:00 वाजता दौंड शहरातील संत तुकडोजी शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. दु.4:00 वाजेपर्यंत हि मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून या निवडणुकीमध्ये 18 जागे करिता एकूण 39 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
दौंड शहरासह तालुक्यातील राहू, यवत, केडगाव, पाटस, खडकी या 6 मतदान केंद्रावर 2,808 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. दौंड शहरातील मतदान केंद्रावर सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी व हमाल मापाडी या प्रवर्गासाठी 612 मतदार मतदान करत आहेत. मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त व्हावी म्हणून कूल-थोरात गट आपापल्या बूथवर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. दोन्ही गटाचे पदाधिकारी मतदान केंद्रावर मतदाराचे स्वागत करीत असून सध्यातरी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.