दौंड : खा.संजय राऊत यांची दौंड तालुक्यातील वरवंड येथील जाहीर सभा आज विशेष गाजली.या सभेत भ्रष्टाचार, भीमा पाटस सहकारी कारखाना आणि त्यावर झालेला भ्रष्टाचार याचा खरपूस समाचार उपस्थितांनी घेतला.
या सभेअगोदर खासदार संजय राऊत यांचा वरवंड, पाटस कारखाना दौरा खऱ्या अर्थाने गाजला. खासदार संजय राऊत यांचे वाहन वरवंडला पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवले आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असे म्हटल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नामदेव ताकवणे आणि पोलिस यांच्यात हुज्जत झाली. त्यावेळी ताकवणे यांनी पोलिसांना परिस्थितीची जाणीव करून दिल्याने त्यांचे वाहन पुढे जाऊ देण्यात आले. मात्र पाटस येथे पुन्हा त्यांचे वाहन अडविण्यात येऊन त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला मात्र खा.राऊत, कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन रमेश थोरात, माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी त्यास न जुमानता वाहन कारखान्यात नेऊन तेथे कै.मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आणि सभेकडे रवाना झाले.
अध्यक्षीय भाषणामध्ये खा.संजय राऊत यांनी मोदींच्या नितीवर हल्ला चढवत, मोदी फक्त भ्रष्टाचाऱ्यांच्या प्रचाराला जातात. जो भ्रष्टाचार करत नाही त्याला त्यांच्याकडे थारा नाही असे म्हणत नामदेव ताकवणे, रमेश थोरात यांचा मी आभारी आहे की त्यांनी हा इतका मोठा भ्रष्टाचार माझ्या समोर आणला. मला तुरुंगाची भिंत आडवू शकली नाही तर 144 कलम काय अडवणार! शेतकरी सभासदांच्या कारखान्यावर 144 कलम हे भीतीचं लक्षण आहे. त्यांनी आम्हाला 10 किमी अगोदर अडवलं कारण काय तर दंगल होईल. पण एक सांगतो आम्ही दंगल सांगून करतो, लपून करत नाही. आम्हाला अडवलं गेलं पण आम्ही आत गेलोच आणि पुष्पहार अर्पण करून परत आलो. हा कारखाना कुणाच्या बापाचा नाही, हा कारखाना शेतकरी सभासदांचा आहे. त्यामुळे येथे कुणी मालकाचा रुबाब करु नये अश्या पद्धतीने त्यांनी ताशेरे ओढले.
पुढे बोलताना राऊत यांनी, कमी वयात आप्पांनी तुम्हाला कारखान्यावर संधी दिली होती त्याचं तुम्ही सोनं करायला हव होतं मात्र तुम्ही त्याची माती केली. यांचा भ्रष्टाचार पाहता कारखान्याच्या या 50 हजार सभासदांनी यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करायला हवा. आणि मी सुद्धा 2 महिन्यापासून गृहमंत्र्यांकडे भीमा पाटस कारखान्याच्या विषयांसाठी वेळ मागत आहे पण वेळ काही दिला जात नाही. शेवटी आता मी सीबीआय कडे तक्रार केली आहे नंतर ‘इडी’कडेही करणार असून शेवटी सुप्रीम कोर्टातही जाण्याची तयारी केली असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तसेच विरोधी पक्ष संपविण्यासाठी भाजप नेते, मंत्री, आमदारांवर वर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना संपविण्याचे काम करत आहे. मात्र त्यांना याचे उत्तर लवकरच मिळेल. पुढीलवेळी इकडे येताना किरीट सोमय्या ला या कारखान्यात आणणार आहे, नाही आला तर कॉलर पकडून आणणार आणि त्याला दाखवणार की हा भ्रष्टाचार नाहीतर काय आहे यावर बोल.. असे म्हणत त्यांनी ‘मिस्टर कुल’ तुम कुल हो तो ‘मै मिस्टर हॉट हू’.. मै तुम्हे छोडुंगा नही असा इशारा आमदार तथा कारखान्याचे चेअरमन राहूल कुल यांना दिला.
कोण हा निराणी आणि येथे कसा…
खासदार राऊत यांनी कारखाना भाड्याने चालवीण्यास घेतलेल्या निराणी बद्दल बोलताना, कोण हा निराणी, अचानक कुठून आला.. यांना महाराष्ट्रात कुणी चालवणारा सापडला नाही का, जर जमत नव्हतं तर बाजूला व्हायचं ना, पण दुसऱ्याला का दिला असा सवाल उपस्थित केला. हे लोक महाराष्ट्र खड्ड्यात घालायला निघाले आहेत. जसा कारखाना विकला तसा मुंबई विकण्याचा प्रयत्न सुरु आहे. इडी, सीबीआय वापरून प्रत्येक पक्ष फोडून भाजप वाढवायची हे एकच यांचं काम आहे. हा कारखाना जो पर्यंत सुस्थितीत येत नाही तो पर्यंत या कारखान्यासाठी लढत राहील. देवेंद्र फडणवीस यांनी जे 36 कोटी दिले त्याचे काय झाले. फसणवीस तुम्ही स्वतः यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करायला हवा. कारण ही तर सरळ सरळ लूट सुरु आहे. आणि आपल्याला लूट मुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे त्यामुळे भीमा पाटस कारखाना प्रामाणिक हातात गेल्या शिवाय मी स्वस्त बसणार नाही. तुम्ही कितीही पोलिस बळ वापरा, आम्ही मागे हटणार नाही. जो झुंजतो तोच टिकतो असे म्हणत संजय राऊत यांनी आपण पुन्हा येथे येणार असल्याचे संकेत देत आपले भाषण संपवले.
यावेळी भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, माजी आमदार रमेश थोरात तसेच वैशाली नागवडे यांनी भीमा पाटस कारखान्यावरील भ्रष्टाचाराचा खरपूस समाचार घेतला. नामदेव ताकवणे यांनी आ.कुल यांना चॅलेंज करत मी 1 मेला कारखाण्यात कै.मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यासमोर येऊन बसतो तुम्हीही या आणि मी केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करा, मी तुमच्या घरी वर्षभर धुणी भांडी करेन आणि जर हे आरोप सिद्ध झाले तर तुम्ही येरवड्यात असाल असा इशारा दिला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी या तालुक्यातील जनतेचे आभार मानले आणि 500 कोटींचा घोटाळा ऐकूण आपण सुन्न झाल्याचे सांगितले.