दोघात ‘तिसरा’, सध्यातरी विसरा… पण का? जाणून घ्या

संपादकीयअब्बास शेख

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहूल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात… अगोदर दोन गट आणि नंतर दोन पक्ष. दोन गटांत 23 वर्षांचा संघर्ष, कधी बाजी इकडे तर कधी तिकडे पण… तिसरा आला की अगोदर त्याचा कार्यक्रम नंतर पुन्हा दोघांत राजकीय घमासान सुरु. असा काहीसा दौंड तालुक्यातील कुल-थोरात गटातील हा संघर्ष आहे.

दौंड तालुक्यात दोनच गट आणि त्यांचीच सत्ता का? असा सवाल उपस्थित करून अनेकांनी तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला खरा पण तो प्रयत्न कायमच अयशस्वी राहिला. याची काही कारणे आहेत आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जनमत… दौंड तालुक्यातील जनमत हे कायम कुल आणि थोरात यांच्याच पाठीशी राहिले आहे त्यामुळे या दोन गटांतून जनमत तोडून स्वतःकडे वळवणे वाटते तितके सोपे नाही आणि जर तसा प्रयत्न कुणी केला तर त्याला याची जबर किंमतही मोजावी लागली आहे.

कुल-थोरात यांच्याविरोधात सर्वात पहिले दंड थोपटले होते ते वासुदेव काळे यांनी. भाजप च्या वतीने वासुदेव काळे यांनी दिवंगत आमदार सुभाष आण्णा कुल यांना तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. एकवेळ अशी होती की त्यांनी विधानसभेला 40 हजारांच्या पुढे मते घेतली होती. मात्र त्यांचाही कुल-थोरात यांच्यात निभाव लागला नाही. त्यानंतर कालांतराने तिसरी ताकद उभी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नामदेव ताकवणे, राजाराम तांबे, विकास ताकवणे, बाळासो कापरे, महेश पासलकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ज्यांनी नको कुल, नको थोरात म्हणत आपली छोटीसी का होईना पण वेगळी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला पण जवळपास या सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या नावांमध्ये अजूनही प्रबळ नावे आहेत ज्यामध्ये आनंद थोरात, आप्पासाहेब पवार, विरधवल जगदाळे, वैशाली नागवडे यांचा समावेश होतो. मात्र या नेत्यांनी कायम पक्षादेश मानून आपली इच्छा पक्षापेक्षा मोठी होऊ दिली नाही.

कुल आणि थोरात यांच्यामध्ये तिसरा आला की दोन्ही गटाकडून अगोदर त्यावर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्याचा सुपडा साफ झाला की मग हे दोन्ही गट पुन्हा आपापसात भिडण्यास सज्ज होतात असा एक अनुभव जुन्या जाणकारांकडून ऐकायला मिळतो त्यास काहीजण अफवाही म्हणतात मात्र ही अफवा आहे की सत्य परिस्थिती हे ज्यांना अनुभव आला आहे त्यांनाच माहित. पण कुल आणि थोरात यांच्याशिवाय दौंडची जनता दुसऱ्याला सहज स्विकारत नाही हेही सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळेच की काय जो पर्यंत कुल गट किंवा थोरात गट एखाद्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत त्या निवडणुकीला रंग चढत नाही.

सध्याही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असून सध्या दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत कुल गट (भाजप) तर थोरात गट (राष्ट्रवादी) आपली ताकद अजमाविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या दोन्हीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे महेश पासलकर यांनी महाविकास आघाडीचा दाखला देत राष्ट्रवादीला काही जागा मागितल्या होत्या पण आपले प्राबल्य दाखवा आणि जागा घ्या ही भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने पासलकर यांची गोची झाली आणि आपल्या हाती या आघाडीत काही लागणार नाही हे समजून आल्याने त्यांनी आपल्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी विरोधातच स्टेटस, पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महेश पासलकर हे दौंड तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाले ते कुल गटातूनच. त्यांनी अगोदर कुल गटासाठी मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला मात्र काही गोष्टींमुळे त्यांनी कुल गटातून फारकत घेऊन ना कुल, ना थोरात असे म्हणत आपला स्वतंत्र शिवसेना गट वाढविण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेना, भाजप व्हाया महाविकास आघाडी या राजकीय आखाड्यात त्यांची अक्षरशा दमछाक झाली आहे. आणि आता दौंड तालुक्यातील राजकीय परिस्थिती त्यांनी समजून घेताना त्यांना हळू हळू या गोष्टीचीही जाणीव होऊ लागली आहे की कुल आणि थोरात या दोन्ही गटाविरोधात तिसरी ताकद उभी करणे किती जिकिरीचे काम आहे. त्यामुळे यापुढे महेश पासलकर हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्याची वरील परिस्थिती आणि समीकरणे पाहता ‘दोघात तिसरा, सध्यातरी विसरा’ असेच काहीसे समीकरण असून तिसरा प्रबळ पर्याय कधी जोर धरणार हे आतातरी सांगणे अवघड आहे.

विशेष सूचना – वरील लेख हा कॉपीराईट कंटेन्ट आहे. कुणीही यातील मजकूर कॉपी पेस्ट करण्याचा किंवा मजकूर चोरून त्याचा वापर आपल्या बातमीत करण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा त्यावर कॉपीराईट कंटेन्ट नियमाखाली तसेच मजकूर चोरीच्या खाली कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. संपादक – सहकारनामा