दौंड : न्हावरा ते चौफुला अशी सीएनजी (CNG) ची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने केडगाव-बोरिपार्धी (ता.दौंड) हद्दीत एका तरुणाला भर रस्त्यात चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भरधाव वाहनाच्या धडकेत हा तरुण जागीच ठार झाला असून वाहनचालकांच्या मुजोरीमुळे हा अपघात घडल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण हा केडगाव येथील पिसे वस्तीवर राहणारा असल्याची माहिती मिळत असून तो दौंड येथील बँकेत नोकरी करीत असल्याचे समजते.
मिळत असलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री न्हावरा ते चौफुला अशी भरधाव वेगात CNG वाहतूक करणाऱ्या ट्रकने केडगाव-चौफुला रोडवर चौफुल्याकडे चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकमध्ये दुचाकीवरील तरुण वाहनाखाली आल्यानंतर त्याला या वाहनाने काही अंतर फरफटत नेले त्यामुळे हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. हा अपघात घडल्यानंतर काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ॲम्ब्युलेंस वेळेवर न आल्याने हा मृतदेह सुमारे पाऊण तास रस्त्याच्या माध्यभागी पडला असल्याची माहिती प्रत्यक्षदार्शीनी दिली. याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना देताच अवघ्या पाच मिनिटांत ॲम्ब्युलेंस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध होत असताना यवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर नंतर आता मुजोर बनत चालेल्या CNG वाहन चालकांवर अंकुश गरजेचा
सध्या न्हावरा-चौफुला हा राष्ट्रीय महामार्ग अरुंद स्थितीमध्ये आहे. या रस्त्याने एकाचवेळी दोन मोठी वाहने ये-जा करु शकतात. मात्र CNG वाहन चालक या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवून पुढे चाललेल्या प्रत्येक वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. मग कधी समोरून येणाऱ्या वाहनाशी त्यांचा अपघात होतो तर कधी समोरून चाललेल्या वाहनाला ते धडक देऊन पुढे जात असल्याची माहिती या रस्त्याने प्रवास करणारे प्रवाशी देत आहेत.
न्हावरा – चौफुला असा प्रवास करणाऱ्या या CNG वाहक वाहनांचे अनेकवेळा या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यास या वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे या वाहनांवर आणि त्याला चालवीणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक पीडित नागरीक करत आहेत. काही काळापूर्वी पुणे-सोलापूर हायवेने बेभान होत भरधाव वाहने चालवून अनेक अपघात करणारे वाळू वाहन चालक पोलिसांचा ‘चाप’ बसल्यानंतर जागेवर आले, तसाच चाप आता या CNG वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर बसण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा हे बेभान चालक यापुढेही भरधाव वाहने चालवून अनेकांचा बळी घेतील यात शंका नाही.