Daund | शहरामध्ये अभूतपूर्व जल्लोषात ‘भीम’ जयंती साजरी

दौंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व शहरातील सर्वच दलित संघटनांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न… महामानव…. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने दि.10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान विविध संघटनांकडून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील भीम नगर ,सिद्धार्थ नगर ,इंदिरानगर ,शालिमार चौक, सरपंच वस्ती परिसरातील भीमसैनिकांच्या वतीने व दौंड रेल्वे प्रशासनाच्या वतीने भीम जयंती साजरी करताना विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलावर्ग तसेच युवा भीमसैनिकांनी शहरातून मोटार सायकल रॅली काढून जयंती साजरी केली. पांढरी शुभ्र साडी व डोक्यावर निळा फेटा परिधान करून हातात निळा झेंडा फडकवीत मोठ्या संख्येने महिला रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. बाबासाहेबांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला होता.
दि.13 एप्रिल रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हजारोंच्या संख्येने भीमसैनिक एकत्र आले. परंपरेप्रमाणे ठीक 12 वा. राजगृह बुद्ध विहाराचे राजेश मंथने यांनी पंचशील व त्रिशरण पठण केले.

यावेळी सर्वप्रथम आमदार राहुल कुल यांनी बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मा. आमदार रमेश थोरात,मा. नगराध्यक्ष इंग्रजीत जगदाळे, योगेश कटारिया तसेच तहसीलदार संजय पाटील, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस ,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी टेंगळे व विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच भीमसैनिकांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन केले.

दि.14 एप्रिल रोजी दलित संघटनांच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या चोहोबाजूने आलेल्या मिरवणुकांमध्ये हजारो भीमसैनिक व सर्वच समाजाचे युवक सहभागी होते. जय भीम चा नारा देत व गाण्यांच्या तालावर ठेका धरत भीमसैनिकांनी अतिशय जल्लोषात भीम जयंती साजरी केली.