बारामती : काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बारामती तालुक्यातील सुपे या गावामध्ये असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानावर 5 ते 6 जणांच्या टोळक्याने दरोडा टाकला होता. दुकानातून बाहेर पडताना यातील काहींनी गोळीबार केला होता. यात 2 जण जखमी झाले होते. एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले होते तर अन्य पसार झाले होते.
या प्रकारानंतर सुपे आणि बारामती ग्रामीण (वडगाव निंबाळकर) पोलिसांची सूत्रे वेगात फिरून पुन्हा एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे. काल पकडलेल्या आरोपीचे नाव पवन विश्वकर्मा (रा.उत्तर प्रदेश) असे असून आज पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप बिसेन (रा.गोंदिया) असे आहे. या दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून या आरोपिंनी पिस्टल कुठून आणले, त्यांचे अन्य साथीदार कोण आणि कुठले आहेत तसेच दरोड्याच्या प्लॅनमध्ये कुणी स्थानिक व्यक्ती सामील आहे का अश्या विविध प्रश्नासंदर्भात सुपे पोलिस न्यायालयाने आरोपिंना जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची मागणी करणार असल्याचे समजत आहे.
काल महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकताना साधारण 5 ते 6 आरोपी होते. त्यांच्यातील बहुतेकांकडे ओरिजनल पिस्टल होते. दुकान लुटून बाहेर पडताना त्यांना लोकांकडून प्रतिकार झाल्यानंतर आरोपिंनी बेछुट गोळीबार सुरु केला यात दोनजन जखमी झाले. दरोडेखोरांनी लोकांच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्याची माहिती पुढे येत असून या 3 गोळ्यांमुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला असता याची कल्पना करूनच अनेकांच्या अंगावर शहारे येत आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.जी.शेख करीत आहेत.