केडगाव (दौंड) : केडगाव ता. दौंड येथील शेतकऱ्याला माल खरेदी करून तो दुबईला पाठविण्याच्या बहाण्याने सुमारे 23 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना केडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केडगांव (ता.दौंड) येथील फिर्यादी शेतकरी अक्षय तानाजी काळभोर (रा.केडगाव, देशमुख मळा ता.दौंड) यांच्या घरी धनंजय सुरेश शितोळे (रा.उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे) नामक व्यक्ती आली आणि तुमचे मामा व माझे चुलते हे चांगले मित्र आहेत. मी खुप मोठा निर्यातदार आहे. दुबईमध्ये माझी खुप मोठी ओळख असुन तेथे माझा मोठा गाळा आहे अश्या गप्पा मारून सदर शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला.
मी आपल्या शेतकऱ्यांचा माल विकत घेवुन बाहेरील देशात पाठवितो त्यामुळे तुम्ही दुस-या व्यापाऱ्याला माल दिला तर तो तुंम्हाला फसवु शकतो त्यामुळे आपण एकत्र शेतक-यांकडुन माल खरेदी करून तुमच्या कंपनीच्या नावाने बाहेर देशात माल निर्यात करू. तुम्ही मला 20 लाख रूपये द्या मी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतो असे सांगुन फिर्यादीचा माझा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून रोख 9 लाख रूपये तसेच खात्यावर 8 लाख 50 हजार रूपये व 5 लाख 50 हजार रुपयांचा 29 टन कांदा असे मिळून 23 लाख रूपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद अक्षय काळभोर यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादिवरून आरोपी धनंजय सुरेश शितोळे (रा. उरुळी कांचन, ता.हवेली जि.पुणे) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा.फौजदार गाडेकर करीत आहेत.