दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन येथे एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला भिषण आग लागून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही घटना आज शुक्रवारदि.17 मार्च रोजी रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दुकानाला आग लागण्याचे कारण अद्याप समजले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्यावेळी बंद दुकानातून अचानक धूर येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दुकानाकडे धाव घेत आतील आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले नाही.
आज शुक्रवार असल्याने केडगाव स्टेशनमधील बहुतांश दुकाने बंद असतात. आज हे दुकानही बंद ठेऊन त्याचे मालक अंकुश बारवकर हे आपल्या काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज रात्री 9:00 च्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे कळताच त्यांनीही दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणून या दुकानातील वस्तू वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने दुकानात असलेल्या लाखो रुपयांच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या.