केडगाव ते विधानसभा | जयंत पाटलांचा ‘त्या’ मारहाण प्रकरणात ‘यवत’ पोलिसांवर गंभीर ‘आरोप’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदौंड तालुक्यातील यवत पोलिसांवर आणि त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका मारहाण प्रकरणाची माहिती देताना त्यांनी काही खुलासे केले आहेत.

यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या केडगाव येथे मागील महिन्यात शरद गायकवाड या युवकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या मारहाण प्रकरणी नवनाथ गायकवाड आणि त्याच्या भावांवर शरद गायकवाड यास तीक्ष्ण हत्याराणे गंभीर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना देताना डॉक्टरांचा मेडिकल रिपोर्ट सभागृहात वाचून दाखवला.

जयंत पाटील यांनी या घटनेतील फिर्यादीचा रिपोर्ट मेडिकल सर्टिफिकेट मध्ये नॉर्मल असल्याचे सभागृहाला वाचून दाखवले आहे आणि हा गुन्हा पोलिसांनी चुकीची कलमे लावून दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नॉर्मल रिपोर्ट असताना तीक्ष्ण हत्याराने मारहाण करण्यात आल्याचा चुकीचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला असल्याचे त्यांनी सभागृह अध्यक्षांच्या यावेळी लक्षात आणून दिले.

यवत पोलिस ठाणे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात गाजत आले आहे. मागील काळात अनेकवेळा या पोलिस ठाण्यावर मोर्चे काढण्यात येऊन आंदोलनेही करण्यात आली आहेत. त्यातच आता जयंत पाटील यांनी यवत पोलिसांवर अश्या प्रकारचे गंभीर आरोप केल्याने यवत पोलिस ठाणे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.