‘शोरूम’ मधून दिड लाखाची ‘दुचाकी’ चोरट्याने पळविली

दौंड : दौंड-पाटस रोडवरील गोपाळवाडी हद्दीमध्ये असलेल्या स्वामी बजाज सेल्स अँड सर्विस सेंटर या दुचाकी शोरूम मधून अज्ञात चोरट्याने 1 लाख 57 हजार रु. किमतीची दुचाकी (पल्सर) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

दि.13 मार्च रोजी सायंकाळी 7 वा. ते मंगळवार दिनांक 14 मार्च दु. 3.45 वा. च्या दरम्यान शोरूम बंद होते आणि हीच वेळ साधत चोरट्याने शोरूमच्या शटरची लोखंडी पट्टी उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला व शोरूममध्ये असलेल्या दुचाकी पैकी पल्सर (160,NS) चोरून नेली. या प्रकरणी शोरूम चे मालक निखिल बाबुराव स्वामी (रा.सुतार नेट, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 13 मार्च रोजी फिर्यादी स्वामी व शोरूम मध्ये कामाला असलेला फिटर गोपाल हे दोघे दिवसभर गाड्यांची विक्री करण्यासाठी शोरूम मध्ये थांबले होते. सायंकाळी 7 वा. शोरूम बंद करून फिर्यादी घरी गेले. 14 मार्च रोजी मंगळवार असल्याने शोरूम बंद होते, त्यामुळे फिर्यादी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. फिर्यादी यांनी पुण्याहून फिटर गोपाल यास मोबाईल वरून संपर्क साधला व तू शोरूम ची चावी घरातून घे उद्या एका गाडीची (डोमिनॉर) डिलिव्हरी द्यावयाची आहे असे सांगितले. त्यामुळे गोपाळ दुपारी 3.45 वा. सुमारास शोरूम वर गेला असता त्याला शोरूमच्या लोखंडी शटर च्या कुलपाचे वरील बाजूची पट्टी कटवणीने काढलेली दिसली. त्यामुळे त्याने त्वरित मालकाला दिसत असलेला प्रकार सांगितला. तेव्हा फिर्यादीने त्याला सांगितले की तू शोरूम मध्ये जा व तेथे असणाऱ्या गाड्या मोज तोपर्यंत मी येतो.

फिर्यादी सायंकाळी 7 च्या सुमारास आले. त्यांनी व फिटर ने शोरूम ची पाहणी केली असता शोरूम मधील बजाज कंपनीची पल्सर एन.एस 160 ही दुचाकी दिसून आली नाही. तसेच शोरूम मध्ये असलेले सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन (की.3500/रु.) सुद्धा चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्वामी यांचे शोरूम सोमवारी सायंकाळी बंद झाल्यानंतर ते थेट बुधवारीच उघडले जाते याची माहिती घेऊनच चोरट्याने हा डाव साधला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.