तुषार हगारे
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता.दौंड) हद्दीत हॉटेल पंचरत्न समोर भरधाव वेगाने निघालेल्या स्वीफ्ट गाडी चालकाचा ताबा सुटल्याने भिषण अपघात झाला असून यात दोनजण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. ही घटना आज रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.
या अपघातामध्ये वैभव विठ्ठल जांभळे (वय 24) रा. तक्रारवाडी (ता. इंदापूर जि. पुणे) आणि प्रतीक पप्पू गवळी (वय 22 रा.मोशी ता. हवेली जि.पुणे) हे दोघे जागीच ठार झाले आहेत तर आसिफ बशीर खान, सुरज राजू शेळके (दोघेही रा. भिगवण ता.इंदापुर जि.पुणे) आणि ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय 22 रा इंदापूर ता. इंदापूर) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या भीषण अपघामध्ये तक्रारवाडी येथील युवा व्यावसायिक वैभव जांभळे यांचा मृत्यू झाल्याने तक्रारवाडी गावावर शोककळा पसरलीय. तक्रारवाडी गावची यात्रा दोन दिवसांवर येवून ठेपली असतानाच अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे..