दौंड : (अख्तर काझी)
ग्रामपंचायत निवडणुक कामात हलगर्जी केल्याप्रकरणी अखेर शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सोनवडी येथील वार्ड क्रमांक 2 अ चे मतदान केंद्राध्यक्ष नानासाहेब रामचंद्र शिंदे हे मतदान अधिकारी 1 यांच्या जागेवर बसून होते तसेच एका महिलेचे मतदान त्यांनी स्वतः जाऊन केले असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी समक्ष जाऊन पाहणी करून जबाब घेतले तसेच झोनल अधिकारी निर्मला राशिनकर यांनीही या घटनेचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला होता. तसेच सोनवडी ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी ना. ल. सासवडे यांनी ही तहसीलदार दौंड यांना दिलेल्या पत्रात नानासाहेब शिंदे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर दौंड चे तहसीलदार संजय पाटील यांनी नानासाहेब रामचंद्र शिंदे यांना खुलासा मागविला होता, त्यानुसार शिंदे यांनी त्यांचा खुलासा तहसिलदार पाटील यांच्याकडे सादर केला त्यांचा खुलासा तहसिलदार पाटील यांनी अमान्य करत त्यांनी निवडणूक कामात व शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम-1958 अन्वये व प्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार कारवाई करण्यासाठी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांना प्राधिकृत केले होते.
त्यानुसार दि.24 रोजी दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे यांनी दौंड पोलीस ठाण्यात नानासाहेब शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 25, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 आणि 1988 चे कलम 134,136,136(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.
फिर्याद देण्यास गटशिक्षण अधिकारी यांनी वेळ का लावला!
दौंडचे तहसिलदार संजय पाटील यांनी गटशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांना दि.20 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते. 20 जानेवारी नंतर दि.24 मे रोजी गुन्हा दाखल केल्याने गेले चार महिने गट शिक्षणाधिकारी यांनी गुन्हा दाखल का केला नाही?
निवडणुक काळात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश असतानाही चार महिन्यांनंतर गुन्हा दाखल केला गेल्याने शिक्षणाधिकारी यांची चौकशी करावी अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.