दौंड : शहरातील ख्वाजा वस्ती व उत्सव अपार्टमेंट परिसरातील भुयारी गटार व रस्त्यांची अवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे, त्यामुळे या परिसरातील गटारी व रस्त्यांचे काम नगरपालिकेने त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथील जनकर्तव्य सामाजिक युवा संघटनेच्या वतीने दौंड नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
या परिसरातील भुयारी गटारीचे दूषित पाणी येथील उत्सव अपार्टमेंट व इतर सोसायट्यां मध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्यामुळे संतप्त स्थानिकांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले. संघटनेच्या मागणीप्रमाणे परिसरातील कामे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन नगरपालिकेने आंदोलकांना दिल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. परंतु नगरपालिकेने आश्वासन दिल्याप्रमाणे जर कामे सुरू केली नाहीत तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जनकर्तव्य युवा संघटनेचे अध्यक्ष अनिकेत मिसाळ, उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव, बांधकाम विभागाचे अभियंता भोसले ,आरोग्य विभागाचे निरीक्षक शाहू पाटील तसेच ख्वाजावस्ती व उत्सव अपार्टमेंट परिसरातील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.
परिसरातील समस्या मार्गी लावण्यासाठी नगरपालिका अयशस्वी ठरत आहे. नगरपालिकेकडून केली जाणारी कर वसुली मात्र वेळेवर केली जाते. येथील लोकांच्या आरोग्याचा व अडचणींचा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र नगरपालिका अलिप्त राहते असा आरोप संघटने कडून करण्यात येत आहे.
उत्सव अपार्टमेंट साठी मोठी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात यावी, परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्या रस्त्यांची कामे नगरपालिकेने त्वरित सुरू करावीत, या परिसरातून जड वाहनांना वाहतूक बंदी करावी अशा मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्याआहेत.