भावाच्या घरातील 10 लाखाचे ‘दागिने’ चोरणारे दोन सख्खे भाऊ जेरबंद, ‘दौंड’ शहरात ‘LCB’ चे कसब आले कामी

दौंड : चुलत भावाने आपल्याच भावाच्या घरातील 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना दौंडमध्ये उघडकीस आली असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग (LCB) ने दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या इरिगेशन कॉलनी येथील प्रिया महेश रणसिंग यांच्या घरातील सर्वजण एका कार्यक्रमाकरीता बाहेर गेले होते. ते बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या
घरातील बाथरूमच्या खिडकीवाटे प्रवेश करत त्यांच्या घरातील स्टीलच्या डब्यामधील 10 लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत फिर्यादी प्रिया रनसिंग यांच्या फिर्यादीवरुन दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५१८ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे दिनांक १६/१०/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयांचा तपास दौड पोलीस स्टेशन यांनी केला त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांचा सख्खा चुलत दिर करण उर्फ विक्री अजित रणसिंग याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याप्रमाणे त्यास पोलीस स्टेशनला बोलावून तपास केला होता. परंतु आरोपी हा सराईत असल्याने खोटी उत्तरे देवून पोलीसांची दिशाभूल करीत होता. त्यामुळे गुन्ह्याचा तपास हा भरकटत होता. सदरची माहीती LCB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना समजली. त्यांनी लागलीच सदर गुन्ह्याच्या तपासकामी सपोनि. राहूल गावडे, पोहवा / ४४ सचिन घाडगे, पोहवा / २०१ आसिफ शेख, पोहवा / १९६७ विजय कांचन, सफौ. मुंकूद कदम यांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सुचना केल्या. त्यानंतर सदर पथकाने दौड येथे जावून संशयित आरोपी करण उर्फ विकी अजित रणसिंग यास तपासकामी बोलावून घेतले. त्यास वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी करण उर्फ विक्री अजित रणसिंग याने गुन्हा केल्याचे सांगितले व त्यामध्ये त्याचा भाऊ गुन्हयातील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याकरीता मदत केली असल्याचे कबूल केले. त्यामुळे सदर गुन्ह्याच्या पुढील तपासकामी आरोपी करण उर्फ विकी अजित रणसिंग, (वय २८ वर्षे) व सुशिल अजित रणसिंग, (वय ३२ वर्षे, रा.इरिगेशन कॉलनी, दौड ता. दौड, जि. पुणे) यांना दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 10 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उप निरीक्षक सुनिता चवरे ह्या करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल, (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) आनंद भोईटे, (अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) राहुल धस, (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, सपोनि / राहूल गावडे, पोहवा/४४ सचिन घाडगे, पोहवा / २०१ आसिफ शेख, पोहवा / १९६७ विजय कांचन, सफौ. मुकुंद कदम यांनी केली आहे.