|सहकारनामा|
दौंड : दौंड तुकाईनगर येथील शेडमधून लाईट व केबल असा इलेक्ट्रीक साहित्य चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने उघडकीस आणून दोघांना जेरबंद करून त्यांचेकडून सुमारे ८७ हजार रुपयाचा माल हस्तगत केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक १५/०५/२०२१ रोजी १८.०० ते दि.१६/०५/२०२१ रोजी १६.०० वा.चे दरम्यान दौंड तुकाईनगर येथील लोकाशेड येथे शिवराम इलेक्ट्रिकल या कंपनीचे शेडमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोकळ्या जागेतून प्रवेश करून बजाज कंपनीचे एल.ए.डी. लाईट, केबल असा एकुण ३,०५,४४३/- (तीन लाख पाच हजार चारशे त्रेचाळीस) रूपयाचा मुददेमाल चोरून नेले बाबत शिवराम इलेक्ट्रिकल या कंपनीचे साईट इन्चार्ज अमलियार जिमालभाई (रा.तुकाईनगर दौंड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत असताना त्यांनी घटनास्थळी भेट देवून गुन्हयाची माहीती घेवून गुन्हा घडलेले आजूबाजूचे ठिकाणचे सी.सी.टि.व्ही फुटेज प्राप्त करून घेतले. सी.सी.टि.व्ही. फुटेज गोपनिय बातमीदार यांना दाखविले असता त्यांचेकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा भिमनगर दौंड येथील ऋषीकेश फासगे, सोमनाथ ढवळे व त्याचे साथीदार यांनी केलेला आहे.
त्या माहितीवरून त्यांचा शोध शोध घेऊन मिळून आलेले आरोपी १) ऋषीकेश माणिक फासगे (वय १९ वर्षे रा.सम्राटनगर, दौंड जि.पुणे) २) सोमनाथ जगन्नाथ ढवळे (वय २२ वर्षे रा.भिमनगर, दौंड जि.पुणे) व एक विधीसंघर्षित बालक यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा आणखीन एक साथीदार याच्या मदतीने सदरचा चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले आहे.
आरोपीचे ताब्यात त्यांनी गुन्हयात चोरी केलेले बजाज कंपनीचे एल.ए.डी. लाईट चे एकुण २६ नग किंमत रूपये ८७,०७४/- (सत्याऐंशी हजार चौर्याहत्तर) असा मुद्देमाल मिळुन आला. तो हस्तगत करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघे आरोपी व जप्त मुददेमाल दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेला आहे. सदर आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबतचा पुढील अधिक तपास दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.