अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यात सध्या बंटी, बबलीच्या जोडीने धुमाकूळ घातला आहे. लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवायचे त्यांना सुंदर मुली दाखवायच्या आणि या युवकांकडून मोठी रक्कम घेऊन त्यांना चुना लावायचा असा प्रकार सध्या तालुक्यात सुरु आहे. केडगाव येथे हा प्रकार घडल्यानंतर सहकारनामा ने याबाबत प्रथम बातमी लावली होती. ती बातमी वाचल्यानंतर यातील आरोपिंनी आपलीही फसवणूक केल्याचे वरवंड येथील युवकाच्या लक्षात आले आणि या बंटी, बबलीच्या जोडीवर दुसरा गुन्हा यवत पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत सुरेश परशुराम दिवेकर (वय 53 वर्षे व्यवसाय शेती रा.सातपुतेमळा वरवंड ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिस ठाण्यात आरोपी 1) निलेश शंकर भारती 2) सिमा निलेश भारती (दोन्ही रा. पुणे नगर रोड सरकारी दवाखान्यामागे वाघेश्वर इंग्लिश स्कुलजवळ वाघोली ता.हवेली जि.पुणे) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपिंनी अजूनही काही लोकांना फसवले असण्याची शक्यता असून अश्या लोकांनी यवत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. 30/10/ 2022 रोजी निलेश भारती, सिमा भारती यांनी फिर्यादी यांच्या वरवंड येथील राहत्या घरी त्यांच्या मुलास एक मुलगी दाखविली. परंतु मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिवशी उभयातांमध्ये काही चर्चा झाली नाही. दुस-या दिवशी आरोपी यांनी फिर्यादी यांना फोनवरुन सांगितले की मुलीस मुलगा पसंत नाही. त्यानंतर साधारण वीस दिवसांनी तारीख 15/11/2022 रोजी दुसरी मुलगी दाखवली तीपण मुलगी मुलाला पसंत झाली नाही. त्यानंतर दिनांक 28/11/2022 रोजी तिसरी मुलगी दाखविली ती मुलाला पसंत झाली पण नंतर त्यांनी फिर्यादीला दिनांक 29/11/2022 रोजी लग्नाची फि म्हणुन अडीच लाख रुपयांची मागणी केली. तसेच यातील 1,25,000/- रुपये लगेच भरण्यास सागितले व लग्न झालेनंतर राहीलेले भरा असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी दिनांक 30/11/2022 रोजी त्यांचा भाऊ बंडु परशुराम दिवेकर यांच्या मोबाईलवरुन निलेश भारती यांचे मोबाईल क्रमांकावर 50,000/-रुपये व मुलगा संदीप सुरेश दिवेकर यांच्या मोबाईलवरुन निलेश भारती यांच्या मोबाईल क्रमांकावर 50,000/-रुपये पाठविले व दुस-या दिवशी दिनांक 01/12/2022 रोजी मुलगा संदीप सुरेश दिवेकर यांच्या मोबाईलवरुन निलेश भारती यांच्या मोबाईल क्रमांकावर 25,000/-रुपये पाठविले.
हे पैसे पाठविल्यानंतर त्यांना वेळोवेळी लग्नासाठी विचारणा केली असता सिमा भारती यांनी फिर्यादी दिवेकर यांना म्हणाल्या की, तुम्हाला जी मुलगी पसंत आहे तिचे वय 18 वर्षे पुर्ण नाही. तिला मे मध्ये 18 वर्षे पुर्ण होणार आहेत त्यावेळी आपण लग्नाचे पाहु असे सांगितल्याने फिर्यादी यांच्या लक्षात आले की सिमा भारती ह्या त्यांना टाळत असुन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यानंतर काही दिवसांत फिर्यादि यांनी केडगावच्या हुमेवस्ती येथील थोरातांची या लोकांनी फसवणुक केल्याची बातमी वाचली आणि आपलीही फसवणुक होत आहे असे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी फिर्यादी दिवेकर हे गेल्या 15 दिवसांपासून आरोपिंकडे त्यांनी दिलेल्या पैशाची मागणी करत होते. तसेच आम्हाला आमच्या मुलाचे लग्न तुमच्या संस्थेमार्फत करायचे नाही आमचे पैसे परत द्या असे म्हणाल्यानंतर आरोपिंनी त्यांना आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे निलेश भारती व सिमा भारती यांनी आपला विश्वास संपादन करुन वेळोवेळी एकुण 1,42,000/- रुपये घेवुन आपली फसवणुक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट यवत पोलिस ठाणे गाठून वरील दोन्ही आरोपिंविरुद्ध फिर्याद दिली आहे.