दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत सध्या वेगवेगळ्या प्रकरणांनी गाजत असून केडगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या गंगाराम गोरगल आणि धोंडिबा मेमाणे या दोन कर्मचाऱ्यांवर केडगाव ग्रामपंचायतीने हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारवाईची नोटीस दिल्याने ग्रामपंचायत विरुद्ध कर्मचारी असा वाद पेटल्याचे पहायला मिळत आहे.
काय आहे प्रकरण… दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी लोक अदालत असल्याने त्या अनुषंगाने केडगाव ग्रामपंचायतने थकीत पाणी पट्टी, घर पट्टी कर वसूलीची नोटीस बजावण्याचे काम पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी गंगाराम गोरगल आणि धोंडिबा मेमाणे या दोन कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी केडगाव ग्रामपंचायतीला दि. 03 फेब्रुवारी 2023 रोजीच विनंती अर्ज करत, आम्हाला गावातील पाणी पुरवठा करण्याच्या कामामुळे कर वसुलीच्या नोटीसा लोकांना वाटण्यास वेळ मिळणार नसल्याचे लेखी कळविले होते. तसेच आमच्या कुटुंबाची उपजीविका यावर अवलंबून असल्याने आमचे पगार आणि थकबाकी हि वेळेवर मिळावी अशी विनंती त्यांनी केडगाव ग्रामपंचायतीला केली होती.
वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या कामातून वेळ मिळत नसल्याने कर वसूली नोटीसा वाटण्यास नकार दिल्यानंतर दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी केडगाव ग्रामपंचायतीने वरील दोन्ही कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येत असल्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसांमुळे दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नुसत्या केडगाव स्टेशन परीसरात पाण्याचे 20 वॉल असून 3 पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. केडगाव स्टेशन ते ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या 3 विहिरिंचे अंतर हे तब्बल 4 किमी आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करताना अनेकवेळा लाईट गेल्याने विहिरीवर जावे लागते, तसेच प्रत्येक ठिकाणी पाणी वेळेवर पोहोच होण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे संपूर्ण वेळ या कामात जात असल्याने लोकांना कर वसूली नोटीसा बाजविण्यात वेळ मिळत नाही असे मत वरील दोन्ही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले असून तश्या प्रकारचा विनंती अर्ज त्यांनी केडगाव ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात दिला होता.
याबाबत केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजित शेलार यांनी याला दुजोरा दिला असून दोन्ही कर्मचाऱ्यांनी लोक अदालत ग्रामपंचायत कर वसूली नोटीस लोकांना बजावली नसल्याने त्यांच्यावर कारवाई नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकंदरीतच केडगाव ग्रामपंचायत आणि त्यातील कर्मचारी हे आपापल्या मतावर ठाम असून यात पुढे काय होते याकडे संपूर्ण केडगावचे लक्ष लागून राहिले आहे.