पुणे : मूर्ती लहान कीर्ती महान अशी एक प्रचलित म्हण आहे. पण आता वय लहान कीर्ती लय गहाण… अशी म्हण 2 आरोपिंबाबत म्हणायची वेळ यवत पोलिसांवर आली आहे. यवत पोलिसांनी दोन आरोपिंना जबरी चोरी करण्याच्या तयारीत असताना वेळीच जेरबंद केले आहे. मात्र यातील एका आरोपीचे वय 20 तर एकाचे 23 आणि गुन्हे दाखल 19 हि परिस्थिती पाहून यवत पोलिसांकडे वरील म्हण म्हणण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार ता. १२/०२/२०२३ रोजी पहाटे ०२:४५ वा. चे सुमारास बोरीपार्धी (ता.दौंड, जि.पुणे) गावच्या हद्दीत असणाऱ्या विघ्नहर्ता हॉटेल जवळ दोन इसम घातक शस्त्रासह जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने आले असल्याची गुप्त माहिती पोना कापरे यांना मिळाली होती. त्यांनी सदरची माहिती रात्रगस्त अधिकारी सपोनि वाबळे यांना सांगीतली व वाबळे यांनी यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि हेमंत शेडगे यांना याची माहिती दिली त्यावेळी प्रभारी अधिकारी यांनी सपोनि वाबळे यांना विशेष सूचना देत सदर ठीकाणी पोलीस स्टफसह जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
यावेळी सपोनि वाबळे, सहा. पो. फौज जाधव, पोना कापरे, पोना आव्हाळे यांनी हॉटेल विघ्नहर्ता येथे जाऊन सापळा लावला. त्यावेळी त्यांना दोन अनोळखी इसम संशयास्पद हालचाल करताना दिसुन आले आणि वरील पथकाने त्या दोघांना काही समजायच्या आत त्यांना चारही बाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपिंनी त्यांची नावे १) मारूती विष्णु पोळेकर (वय २३ वर्षे रा. पाटस, अंबिकानगर ता. दौंड जि पुणे) २) अक्षय दादा मदने (वय २० वर्षे रा. पाटस, अंबिकानगर ता. दौंड जि पुणे) अशी असल्याचे सांगितले. या आरोपिंची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी कोयता, एक लोखंडी छनी, दोन एक्सापान, एक मोटार सायकल, एक चाकु, दोन मोबाईल असा मुद्देमाल सापडला. ते या घातक शस्त्रासह जबरी चोरी / घरफोडी करण्याच्या उद्देषाने एकत्रितपणे आले होते. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.
वय 23 अण गुन्हे दाखल 19...
यातील आरोपी क्र. 1वर तब्बल 19 गुन्हे दाखल असून यामध्ये लोणीकाळभोर पो.स्टे., पुणे शहर,यवत पोस्टे, पुणे ग्रामीण, दौंड पो.स्टे, लोणीकंद पो.स्टे, भारती विद्यापीठ पो.स्टे, हडपसर पो.स्टे, लष्कर पोस्टे, बिबवेवाडी पोस्टे या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. वरील गुन्ह्याचा तपास यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना चोरमले करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वाबळे, सहा. पो. फौज बापु जाधव, पोना कापरे, पोना आव्हाळे यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.