दौंड : मुंबई- सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन वर नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडी मुंबईहून सोलापूर कडे मार्गस्थ झाली. वंदे भारत एक्सप्रेस दौंडवरून जाणार असल्यामुळे व गाडी दौंड स्टेशनला थांबणार असल्यामुळे दौंडमध्ये तिच्या स्वागताची जय्यत तयारी रेल्वे प्रशासन व दौंडकरांकडून करण्यात आली.
रात्री 8 वा. दरम्यान वंदे भारत गाडी चे दौंड स्टेशन मध्ये आगमन होताच उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष केला. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या कांचन कुल ,दौंड- पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष तसेच मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,योगेश कटारिया, शितल कटारिया ,भाजपा चे शहराध्यक्ष फिरोज खान तसेच दौंड रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक जयनाथ त्रिपाठी यांनी गाडीचे स्वागत केले. कांचन कुल व प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते गाडीचे ड्रायव्हर व त्यांचे सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .यावेळी माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या देशाची गाडी, आपली गाडी याचा अभिमान बाळगत दौंडकरांनी गाडीचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येक जण सहकुटुंब गाडीबरोबर सेल्फी काढण्यात दंग होता तर युवा वर्गाने वाजंत्रीच्या तालावर ठेकाधरीत आनंद व्यक्त केला.
वंदे भारत एक्सप्रेस मुंबई- सोलापूर मार्गावर आठवड्यातून सहा दिवस (बुधवार वगळून) धावणार असून मुंबईहून निघाल्यानंतर दादर, कल्याण, पुणे, कुर्डवाडी या स्टेशनवर गाडीला थांबा देण्यात आला आहे. याच मार्गावरील महत्त्वाच्या अशा दौंड जंक्शन स्टेशनला थांबा न दिल्याने दौंडकरांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सर्वप्रथम भाजपा आमदार राहुल कुल यांनी या गाडीला दौंडला थांबा मिळावा अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे व श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनीही गाडीला दौंड स्टेशनला थांबा मिळावा म्हणून रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केलेली आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्टेशनला लवकरच थांबा मिळणार आहे असे बोलले जात आहे.