वरवंडमध्ये एकाचा धारदार शस्त्राने ‘खून’

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड या गावामध्ये एका वयस्क व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हुसेन तांबोळी असे या मृत इसमाचे नाव असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली आहे. याबाबत यवत पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून अचानक घडलेल्या या प्रकाराने वरवंड गावामध्ये खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती मिळताच यवत चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तपास करण्यास सुरुवात केली आहे. हि घटना मंगळवार दि.7 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून मृत इसम हुसेन तांबोळी हे पहाटे आपल्या घराच्या बाहेर आले त्यावेळी त्यांच्या डोक्यात कुणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून हा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

हा प्रकार नेमका काय आहे ते पोलिस तपास करत असून मृतदेह शवविच्छेदणासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक माहिती थोड्याच वेळात अपडेट करत आहोत.