दौंड शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाच्या कामास प्रारंभ, आमदार राहुल कुल यांच्या पुढाकाराने 15 लाखाचा निधी

दौंड : शहराच्या वैभवामध्ये आणखीन भर पाडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाच्या सुशोभीकरण कामास प्रारंभ करण्यात आला आहे. आमदार राहुल कुल यांनी या कामासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार डी. एस .पवार यांची श्री साई कन्स्ट्रक्शन कंपनी सदरचे सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेणार आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकामधील महाराजांचे अश्वारूढ स्मारक शहराच्या वैभवात भर घालत आहे. दौंड -सिद्धटेक अष्टविनायक महामार्गावर असणारे हे स्मारक सर्वांचे लक्ष वेधून घेते. अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या, सिद्धटेक येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक दौंड मार्गे सिद्धटेक येथे जात असतात.

दौंड शहरात आल्यानंतर भाविक आवर्जून या चौकामध्ये थांबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबरोबर आपला फोटो घेताना दिसतात. त्यामुळे या स्मारकाच्या वैभवामध्ये आणखीन भर पडावी या उद्देशाने आमदार राहुल कुल यांनी आपल्या आमदार फंडामधून स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्याच निधीमधून स्मारकाच्या सुशोभीकरण कामास आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवस्मारक समितीचे पदाधिकारी राजेंद्र खटी, अनिल सोनवणे, सचिन कुलथे, अशोक जगदाळे, उमेश वीर आदि उपस्थित होते.