अब्बास शेख
दौंड : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे आपल्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहेत. कुणी आपला कार्यकर्ता असला आणि तो चुकला तर त्याला तिथंच त्याची चूक दाखवून तो दुखवला तरी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची त्यांची सवय आहे आणि हि सवय संपूर्ण तालुक्यात परिचित आहे.
आज त्यांचा मुलगा गणेश उर्फ तुषार याचा वाढदिवस आहे. तुषार आता दौंड तालुक्यातील राजकारणात परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करत असून आज त्याच्या वाढदिवसानिमित्त रमेश थोरात यांनी त्यास मोलाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यावरून माजी आमदार रमेश थोरात यांच्या मनात सर्वसामान्य लोकांबाबत काय भावना आहे हे प्रकट होत आहे.
माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे, चिरंजीव गणेश उर्फ तुषार सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! गेल्या काही वर्षांपासून तू घेत असलेला आपल्या दौंड'च्या समाजकारणातील सक्रिय सहभाग हा खरंच वाखाणण्या जोगा आहे. तालुक्यातील प्रत्येक वंचित घटकाच्या समस्या, अडीअडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहे ही विशेष आनंदाची बाब! आणि याच गोष्टीमुळे ग्रामस्थांकडून तुझं होत असलेल कौतुक बाप म्हणून मनाला समाधान देणारं आहे. सोबतच माझ्या पश्चात तू घेत असलेली कौटुंबिक जबाबदारी मला धीर देऊन जातो.
आज या विशेष दिनी तुला एकच सल्ला. आपल्या दौंडची माणसं ही गरज पडली तर जीवाला जीव देणारी आणि सर्वांवर मनापासून प्रेम करणारी आहेत. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नको! त्यांची मनं जिंकून घे! तुला आज जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
मा.आ.रमेश थोरात यांनी अश्या पद्धतीने आपल्या मुलाला शुभेच्छा आणि सल्ला दिला आहे. सर्वसामान्य जनता हि आपल्यासाठी काय आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय आहोत हे त्यांनी आपल्या मुलाला चार ओळींमध्ये स्पष्ट केले आहे. माजी आमदार रमेश थोरात हे आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यपद्धतीने संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. त्यांनी दौंड चे आमदारपद आणि जिल्हाबँकेचे अध्यक्षपद भूषविताना अनेक विकासकामे करताना भविष्यातील विकासात्मक धोरणे ठरवून उत्कृष्ट निर्णय घेतले होते. आपल्या मुलाने खऱ्याची संगत सोडू नये आणि अचानक येणाऱ्या प्रसिद्धीने भारावून जाऊ नये तर प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाला धीराने तोंड द्यावे आणि भक्कमपणे आपल्या जनतेसोबत उभे रहावे अशी इच्छा त्यांनी यातून व्यक्त केली आहे.
रमेश थोरात यांनी आपल्या मुलाला दिलेला सल्ला हा त्यांच्या संस्काराचा एक भाग असून याबाबत त्यांच्या या सल्ल्याचे संपूर्ण तालुक्यात कौतुक केले जात आहे.