अब्बास शेख
दौंड / पुणे : दौंड रेल्वे स्थानकातून एका विंग कमांडरच्या बॅगेची चोरी झाली. त्या बॅगेत 9mm चे पिस्तूल, 6 राउंड आणि संरक्षण खात्यासंबंधी कागदपत्रे व इतर महत्वाच्या वस्तु चोरीला गेल्या असल्याची माहिती फिर्यादीने दिली आणि पोलिस खात्यासह सर्वांचीच झोप उडाली आहे.
कारण ज्या व्यक्तीची चोरी झाली ती व्यक्ती साधीसुधी नसून भारतीय एअर फोर्समध्ये काम करणारी विंग कमांडर आहे. त्या विंग कमांडरची दौंड रेल्वे स्थानक परीसरात ट्रॉली बॅग चोरी होते. त्या बॅगेत त्याचे पिस्तूल, 6 राउंड संरक्षण खात्यासंबंधी असणारी कागदपत्रे, पासपोर्ट, एटीएम कार्ड आणि एअरफोर्सचा युनिफॉर्म अश्या अनेक महत्वाच्या वस्तू होत्या त्यामुळे दौंड रेल्वे पोलिसांनी कुठलाही विलंब न करता त्या अज्ञात चोरट्यावर विंग कमांडर यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला. विंग कमांडरला दौंड रेल्वे स्थानकात लुटले जाते खरेतर हि अतिशय खळबळजनक अशी घटना म्हणावी लागेल.
मात्र थोडे थांबा, कारण ज्या व्यक्तीने फिर्याद दिली तो खरंच विंग कमांडर आहे का? यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण दौंड रेल्वे पोलिसांनी फिर्यादिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी या विंग कमांडरची माहिती वायू दलाच्या युनिटकडून दौंड पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी अश्या नावाची व्यक्ती एअरफोर्स मध्ये विंग कमांडर म्हणून काम करत असल्याबाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. दिल्ली पासून ते पुण्यापर्यंत वायूदलाच्या सर्व युनिटमध्ये पोलिसांकडून चौकशी केली जात आहे मात्र त्या नावाचा माणूसच सापडत नाही. विशेष म्हणजे यातील फिर्यादी यांच्या वडिलांनाही आपला मुलगा वायू दलात आहे, नेव्हीत आहे कि आर्मीत आहे हे माहित नसल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. ज्या कोणार्क एक्सप्रेसने ते दौंडला आले म्हणतात त्या गाडीच्या वेळेत हे सांगतात त्या प्रमाणे 5 ते 6 तासांची तफावत आढळून येत आहे. या सर्व प्रकाराने पोलिसही बुचकाळ्यात पडलेले दिसत आहेत.
आता विंग कमांडर म्हटले कि ते आयपीएस लेवलचे अधिकारी असतात. या विंग कमांडरांच्या ताब्यात 3-4 विमान युनिट असतात. त्यामुळे इतक्या उच्च दर्जाचा माणूस असा रेल्वेने प्रवास करून मध्येच कुठेतरी उतरेल का? आणि समजा काही करणास्तव त्यांना मध्येच उतरावे लागले तर त्या शहरातील सुरक्षित ठिकाणी थांबण्याऐवजी असाच रेल्वे प्लॅटफॉर्मच्या मोकळ्या जागेत जाऊन तेही मौल्यवान वस्तू सोबत असताना अंथरून टाकून इतका बिनधास्त झोपेल का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे स्वतःला विंगकमांडर म्हणवणाऱ्या व्यक्तीने दिलेली माहिती ही खूपच विसंगती निर्माण करणारी असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.
त्यामुळे चोरीची फिर्याद देणारी व्यक्ती खरंच विंग कमांडर आहे का आणि त्याने दिलेली फिर्याद व त्यातील ऐवज खराच चोरीला गेला आहे का? जर त्या बॅगेत पिस्तूल आणि गोळ्या असतील तर यातून काहीतरी भयंकर होऊ शकते मात्र त्याने दिलेल्या माहितीत इतकी विसंगती का आढळत आहे हा मोठा प्रश्न असून त्याचा व त्याने दिलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचा फोनही का लागत नाही व तो सध्या कुठे आहे? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत. याबाबत अधिक तपास सपोनि कलकुटगे हे करीत आहेत.