अख्तर काझी
दौंड : दौंड रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांच्या किमती ऐवजावर डल्ला मारून चोरटे ऐश करीत आहेत आणि दौंड लोहमार्ग पोलीस अशा घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पत्रकारांपासून लपविण्याचा खेळ करीत असल्याचे चित्र समोर येत आहे.
अशा वाढत्या घटनांमुळे दौंड रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांचा व त्यांच्या किमती ऐवजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशा गंभीर घटनांकडे लोहमार्ग पोलीस गांभीर्याने पाहून थेट रेल्वे स्थानकामध्ये येऊन चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांना पायबंद घालणार का असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार,दि.22 जानेवारी 2023 रोजी रूपा हनुमंतराव नलवडे (वय 40,रा. बागलकोट,कर्नाटक) या सिकंदराबाद -राजकोट एक्सप्रेस गाडीने पहाटेच्या वेळेस दौंड रेल्वे स्टेशनवर उतरल्या. त्यांना पुढे दिल्लीला जायचे होते व दिल्लीसाठीची गाडी सकाळी 10 वा. होती त्यामुळे त्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरच थांबल्या.
पहाटे 3.45 वा. दरम्यान त्यांच्याकडे असणाऱ्या दोन ट्रॉली बॅग व दोन बॉक्स यापैकी एक ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या बॅगेमध्ये वीस हजार रु.रोकड व सोन्याचे दागिने, मोबाईल असा ऐकून 1 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज असल्याचे त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. तसेच दिनांक 23 जानेवारी रोजी भारतीय एअर फोर्स मध्ये विंग कमांडर असलेले दत्ताराम पाटील पहाटे 3 वा च्या दरम्यान दौंड रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर झोपले असता डोक्याजवळ ठेवलेली त्यांची ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अतिशय गांभीर्याची बाब म्हणजे या बॅगेमध्ये 9 एम एम पिस्टल (कीं.20 हजार रू) असल्याचे त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या दोन्ही घटनांची माहिती लोहमार्ग पोलिसांनी पत्रकारांना दिली नाही मात्र पत्रकारांनी आपल्या माध्यमांतून ती मिळविली आहे.
रेल्वे स्थानकातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे दौंड रेल्वे स्थानक चोरांचा अड्डा बनला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कोणीही यावे आणि प्रवाशांच्या ऐवजांवर डल्ला मारून निवांतपणे जावे अशी सध्या दौंड रेल्वे स्थानकाची परिस्थिती आहे. दौंड रेल्वे स्थानकातील अशा चोरीच्या घटनांची नोंद पोलिसांकडे असताना त्याची माहिती पत्रकारांना का दिली जात नाही? पत्रकारांपासून माहिती का लपवली जात आहे? चोरीच्या घटनांची माहिती पत्रकारांना देऊ नका असा त्यांना वरिष्ठांचा आदेश आहे का? असे अनेक प्रश्न पत्रकारांनाही पडले आहेत.