पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांचे दुःखद निधन झाले आहे. ते अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी लढत होते. आज अखेर कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.
मंगळवारी एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. लक्ष्मणराव जगताप हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. 1992 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत नगरसेवकपदी ते निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष नेते शरद पवार यांचे विश्वासू, निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र 2014 साली मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली त्यानंतर त्यांनी शेकाप पक्षात जाऊन तेथून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव पत्करावा लागला होता.
2014 साली त्यांनी भाजपकडून विधानसभा लढवत विजय मिळवला होता. तेव्हापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत भाजपमध्ये निष्ठावान म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते. मागील आठवड्यात भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता लक्ष्मणराव जगताप यांचे निधन झाल्याने भाजपाला पुण्यात हा सलग दुसरा धक्का बसला आहे.