अख्तर काझी
दौंड : शहरातील नवीन तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे काम पूर्ण झाले आहे व ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या मोरीतून सध्या वाहतूक सुरू आहे. परंतु या मोरीमध्ये व परिसरामध्ये अद्याप पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्या वेळेस पादचारी व वाहन चालकांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीमध्ये परिसरातील अंधाराचा फायदा घेऊन या ठिकाणी गुन्हेगारी, लूटमार होऊ नये याकरिता कुरकुंभ मोरी परिसरात पथदिवे बसविण्यात यावेत अशी मागणी आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष नागेश साळवे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. कुरकुंभ मोरी परिसरातील पॉवर हाऊस, वाल्मीक मंदिर, हुतात्मा चौक या ठिकाणी पथदिवे लावावीत अशी त्यांची मागणी आहे.
नवीन कुरकुंभ मोरीच्या प्रवेशद्वारावरच रात्रीच्या वेळेस एका युवकाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे या परिसरात आणखीन काही अप्रिय घटना, अपघात होऊ नये व रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे पथदिवे बसविले पाहिजेत अशी मागणी दौंडकर नागरिकांकडूनही होत आहे.