..तर जैन म्हणवून घेण्यासाठी अर्थच उरणार नाही! दौंड, केडगाव येथे जैन बांधवांकडून मोर्चा काढून ‘या’ निर्णयाचा निषेध

दौंड / केडगाव

केंद्र सरकारच्या वनमंत्रालयाने झारखंड येथील सिद्धक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी या प्राचीन जैनक्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा समस्त जैन बांधवांनी निषेध नोंदविला असून जर तीर्थक्षेत्र सुटले तर धर्मही सुटेल आणि धर्मच राहिला नाही तर जैन म्हणून घेण्यासाठी अर्थच उरणार नाही अशी भावना या मोर्चावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

वन मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात जैन बांधवांच्या वतीने दि. 21 डिसेंबर रोजी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या अनुषंगाने आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी येथील सकल जैन समाजाचे प्रमुख प्रेमसुख कटारिया, शांतीलाल मुनोत, सुशील शहा, घिसुलाल जैन, यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले. येथील श्री विमल पार्श्वनाथ जैन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली व तहसील कार्यालयासमोर त्याची सांगता करण्यात आली.

यावेळी तहसील कार्यालयाकडे निषेधाचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार (निवडणूक) प्रवीण बोर्डे यांनी निवेदन स्वीकारले. मोठ्या संख्येने जैन बांधव या मूक मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड मर्चंट असोसिएशन, व्यापारी महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आम आदमी पार्टी पक्षाने जैन बांधवांच्या आंदोलनास पाठिंबा दिला. निवेदन देईपर्यंत जैन बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.

जर तीर्थक्षेत्र सुटले तर धर्मही सुटेल आणि धर्मच राहिला नाही तर जैन म्हणून घेण्यासाठी अर्थच उरणार नाही अशी भावना जैन बांधवांनी व्यक्त करत या तीर्थक्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राहणार नाही असे मत जैन बांधवांनी नोंदवले आहे. केंद्र सरकारच्या वरील निर्णयाचा निषेध म्हणून आज या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

केडगाव येथेही जैन बांधवांचा निषेध मोर्चा

केडगाव स्टेशन येथे सम्मेद शिखर तीर्थ बचाव यासाठी झारखंड सरकारचा निषेध व्यक्त करण्यसाठी भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष निशांत चोपडा, उपाध्यक्ष संतोष शेलोत , भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा सचिव मनोज पोखरणा, संघाचे खजिनदार चेतन मांडोत, सचिव गौरव गुंदेचा, जेष्ठ श्रावक बबनकाका गांधी, राजाभाई शहा , झंककारमल गांधी, अशोक बेदमुथा, अभय पितळे, सुरेश मांडोत, राहुल शहा, नरेन्द्र गांधी, रमेश मुथा, चंद्रकांत मुथा, सुभाष कासवा, राहुल पितळे, मुकेश मांडोत, मनिष पोखरणा, प्रितम गुंदेचा, संदिप कोठारी, राजु गुगळे, देवेंन्द्र चोरडिया, अजित मुथा, प्रशांत रायसोनी, सुजित पोखरणा, महेन्द्र गांधी तसेच वरवंड संघाचे राजेन्द्र भंडारी , योगेश गुगळे इ. या प्रसंगी उपस्थित होते.

केडगाव येथील मोर्चा हा मारुती मंदिर पासुन ते केडगाव पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला होता. भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा सचिव मनोज पोखरणा यांनी तेथे झारखंड सरकारच्या निर्णय बद्दल जाहिर निषेध नोंदवत मनोगत व्यक्त केले. यावेळी केडगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरिक्षक गाडेकर यांना जैन बांधवांकडून निवेदन देण्यात आले.