दौंड रेल्वे हद्दीमध्ये काकीनाडा एक्सप्रेस मधील महिला प्रवाशाचे तब्बल पावणेतीन लाख रुपयांचे दागिने चोरट्याने केले लंपास

दौंड : दौंड रेल्वे हद्दीतील मलठण रेल्वे स्थानक येण्याआधी पुढील सिग्नल नसल्याने औटरला काकीनाडा एक्सप्रेस थांबली असता या गाडीने प्रवास करणाऱ्या महिलेचे जवळपास पावणेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. गीता धनराज गाणसी(रा. राजमहेंदरी शहर, आंध्र प्रदेश) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली असून लोहमार्ग पोलिसांनी 3 ते 4 अज्ञात चोरट्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दौंड लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, दि.15 डिसेंबर रोजी फिर्यादी आपल्या पतीसह कुर्ला- काकीनाडा एक्सप्रेसने कुर्ला ते राजमुंद्री असा प्रवास करीत होत्या. गाडीने दौंड स्थानक सोडल्यानंतर सायंकाळी 7.20 वा. दरम्यान गाडी मलठण रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पुढील सिग्नल नसल्याने आऊटरला थांबली असता, अज्ञात चोरट्याने डब्याच्या उघड्या खिडकीतून आत हात घालीत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम( 2 लाख 78 हजार 250 रु.) असलेली पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली.

फिर्यादी यांनी याप्रसंगी खिडकीतून बाहेर पाहिले असता या चोरट्याबरोबर त्याचे आणखीन 2-3 साथीदार त्यांना दिसले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. तसेच फिर्यादी यांच्या डब्या शेजारील S/1,S/6 या डब्यातील प्रवाशांचेही दागिने या चोरट्यांनी चोरून नेली असल्याची माहिती फिर्यादी यांनी दिली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस महानिरीक्षक तसेच पुणे लोहमार्ग,पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असल्याचे समजते आहे.