अख्तर काझी
दौंड शहर : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीने दौंड मध्ये निषेध नोंदविला.
चंद्रकांत पाटील तसेच भाजपामधील काही मंत्री राष्ट्रपुरुषांविषयी बेताल वक्तव्य करीत आहेत अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दौंड पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. जनतेच्या मतांच्या भिकेवर निवडून आलेले चंद्रकांत पाटील व भाजपा पक्षाचे मंत्री जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशी चुकीची विधाने करीत आहेत. वाचाळ विधाने ही भाजपाची संस्कृती झाल्यासारखे वाटत आहे. मनुवादी विचार पेरण्याचे काम भाजप सरकार करीत आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, सोहेल खान, हरेश ओझा, गुरुमुख नारंग तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. येथील राजगृह बुद्ध विहाराच्या वतीनेही चंद्रकांत पाटलांचा निषेध करण्यात आला.