दिल्ली महानगर पालिका (MCD) च्या निवडणुकीत ‘आप’ चा 134 जागा जिंकून मोठा विजय, 15 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या ‘भाजप’ चा पराभव

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका (Delhi Election) निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aap) ने 250 पैकी 134 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे एमसीडी (MCD) मध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप (BJP) ला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

या विजयामुळे दिल्लीतील आप मुख्यालयात मोठा जल्लोष सुरू आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे आपण मनापासून आभार मानतो. जगातील सर्वात मोठ्या नकारात्मक पक्षाचा पराभव करून, दिल्लीच्या जनतेने कट्टर प्रामाणिक आणि कार्य करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना विजय मिळवून दिला आहे. आमच्यासाठी हा केवळ विजय नसून मोठी जबाबदारी आहे. निकालांबद्दल बोलायचे झाले तर आप ने 134, भाजप 104, काँग्रेस 9 आणि अपक्षांनी 3 जागा जिंकल्या आहेत.

दिल्ली महापालिकेत गेली १५ वर्षे भाजपची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 181 जागा मिळाल्या होत्या. या वेळी तिन्ही महापालिका एकत्र करून निवडणुका झाल्या आहेत. यासोबतच सीमांकन करून एकूण जागांची संख्या 250 पर्यंत कमी करण्यात आली होती. कडेकोट बंदोबस्तात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. MCD च्या 250 प्रभागांसाठी 4 डिसेंबर रोजी निवडणूक झाली, ज्यामध्ये एकूण 1,349 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत 50.48 टक्के मतदान झाले. आप आणि भाजप या दोघांनीही निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला होता, तर काँग्रेस ने गमावलेल्या जागा परत मिळवण्याच्या प्रयत्नात होते.