‘भुलेश्वर’ घाटात दरड कोसळण्याचे प्रकार! प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज

दौंड / पुरंदर : दौंड-पुरंदर सीमेवर असणाऱ्या भुलेश्वर घाटात कृत्रिम धबधब्यातील दरड कोसळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. संबंधित विभागाने वेळीच येथे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

यवतवरून माळशिरसकडे जात असताना मध्ये भुलेश्वर घाट लागतो. या घाटामध्ये अनेक वेडीवाकडी वळणे आहेत. घाट चढून जात असताना पुढे एक कृत्रिम धबधबा लागतो. सध्या या धबधब्याजवळ मोठ्या प्रमाणावर दगड पडलेले आढळून येत असून हे दगड रस्त्यावरही आल्याचे दिसत आहेत.

जवळ जाऊन हे दगडांचे निरीक्षण केले असता हे दगड या धबदब्यातील दरडीचे असल्याचे दिसून येत आहेत. या दरडी जर जीर्ण झाल्या असतील तर यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेल्या दगडांमुळे येथे अजूनही दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून याचा फटका येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना बसू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित येथील दगड हटवून येथील संभावित दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.