दौंड : केडगाव ता.दौंड येथे एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली असून या युवकाने गळफास घेण्याआधी रात्री 3 वाजून 32 मिनिटांनी गळफास घेण्याचे प्रतिकात्मक व्हाट्सअप स्टेटस ठेऊन नंतर आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागे सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
कु.संकेत प्रकाश लोणकर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून आत्महत्येवेळी त्याचे वय अवघे 23 वर्षे होते. संकेत हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता, संकेत लोणकर या युवकाने सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांमधून व्यक्त केला जात असून त्याच्या मोबाईल तपासणीनंतर यातून अनेक बाबींचा उलगडा होईल असा विश्वास नातेवाईक व्यक्त करत आहेत. याबाबत यवत पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी गळफास घेतल्याची तक्रार दिली आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय? जाणून घ्या
फेसबुक किंवा इतर सोशल साईटवरून लोकांचे मोबाईल नंबर घेतले जातात. त्यानंतर एका अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून अश्या लोकांना व्हिडिओ कॉल येतो. तो कॉल येताच पलीकडे एक महिला अश्लील कृत्य करताना दिसते. आणि ती समोरील व्यक्तीला आपलेसे करून त्यालाही स्वतःचे अनुकरण करण्यास भाग पाडले जाते. याला व्हिडीओ कॉल सेक्स असेही म्हटले जाते. समोरील फोन करणारी स्त्री कॉलचे स्क्रीन रेकॉर्ड करत असते मात्र याची खबर त्या स्त्रीचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तीला नसते. यानंतर त्या व्हिडीओचा वापर कॉल रिसिव्हरला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. त्याला वारंवार फोन करून पैसे मागितले जातात, धमकावले जाते. ते व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी दिली जाते तर कधी कधी खरोखर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केले जातात. समोरील व्यक्ती आपण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असल्याचे सांगते. त्यामुळे भेदरलेली कॉल पीडित व्यक्ती लाजिरवाण्यापणामुळे तक्रार दाखल करण्याचे टाळते किंवा आपल्या जीवाचे बरे वाईट करते.
अश्यावेळी काय कराल?
कायदा काय म्हणतो?
अश्या प्रकरणांमध्ये खंडणी (कलम 383, 384, 385), बदनामी (कलम 499, 500), गुन्हेगारी धमकी (कलम 503, 506, 507) यांसारख्या भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो.
याबाबत सायबर तज्ज्ञ काय म्हणतात ?
सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींसोबत कोणताही वैयक्तिक व्हिडिओ शेअर करताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कधीही तडजोड करणारी प्रतिमा, पोस्ट किंवा व्हिडिओ कोणाशीही शेअर करू नयेत, त्यांचा विश्वास असलेल्या लोकांशीही नाही. आज अशी साधने आहेत जी सायबर गुन्हेगार हटवलेली सामग्री पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरत असतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांकडून आलेल्या मैत्रीच्या विनंत्या स्वीकारल्या जाऊ नयेत किंवा त्या अनोळखी लोकांना पाठवल्या जाऊ नयेत.
तुमची सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवण्यासाठी गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वापरा.
फेसबुकसारख्या अॅपवर तुमची प्रोफाईल लॉक करण्याचीही सुविधा आहे.
फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर क्राइमच्या घटनांची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्याची तक्रार करण्याचा पर्याय आहे.
वापरात नसताना तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि वेब कॅमेरे बंद करा.
तुमच्या सोशल मीडिया खात्यांसाठी मजबूत आणि स्वतंत्र पासवर्डसह द्वि-घटक प्रमाणीकरण वापरा. तुमचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा.
कोणत्याही ऑनलाइन संभाषण किंवा चॅट दरम्यान, जर तुम्हाला फारशी ओळख नसलेली एखादी व्यक्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चिंतेचे कारण आहे. पुरावे सुरक्षित ठेवा. तुमच्या फोनवर नग्न/नग्न/अर्ध-नग्न फोटो/व्हिडिओ क्लिक करणे टाळा. अशी अनेक मोबाइल अॅप्स आहेत जी तुमच्या गॅलरी/स्टोरेजमध्ये प्रवेश करू शकतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
घाबरू नका – अशा फसवणुकीला बळी पडण्याची गरज नाही कारण तुम्हाला त्याबद्दल बोलायला लाज वाटते. पुढे जा आणि तक्रार दाखल करा. असे केल्याने तुम्ही दुसऱ्याला अशाच प्रकरणात अडकण्यापासून वाचवू शकता.