Four youths attacked one another – दौंड मध्ये तरुणावर चौघांचा जीव घेणा हल्ला.. मारहाणीत दोन लाखाची सोन्याची चैन लंपास!



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी) 

दौंड शहरातील समता नगर येथील तरुणावर चौघांनी जीव घेणा हल्ला करून त्याच्या अंगावरील दोन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन मारेकर्‍यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. सौरभ अनिल चव्हाण(रा. समता नगर, दौंड)  मारहाणीत जखमी झाला असून या प्रकरणी तुषार अजय जाधव,आदर्श अनिल जाधव,अमन उर्फ बॉबी अनिल जाधव व सागर जाधव (सर्व रा. गोवा गल्ली,दौंड) यांच्या विरोधात गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

घटनेची सविस्तर माहिती अशी, फिर्यादी सौरभ हा आपल्या मित्रासोबत तो राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये बोलत उभा होता, त्यावेळी आरोपी तुषार मध्ये बोलू लागल्याने त्यास फिर्यादीने तू मध्ये बोलू नकोस म्हणाल्याचा राग आला त्यामुळे त्याने व त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादीस लोखंडी फायटर व रॉड ने गंभीर मारहाण केली. मारहाणीत फिर्यादीस गंभीर दुखापत झाली आहे. हाणामारीत मारेकर्‍यांनी अंगावरील चार तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशि की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये समता नगर परिसरातील पूल गेम अड्ड्यावर काहीतरी वाद झाले व त्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. संपूर्ण शहरामध्ये संचार बंदी असतानाही या परिसरातील हा वादग्रस्त पूल गेम अड्डा सुरू कसा होता असा प्रश्न पुढे येत आहे. 

या आधीही याच पूल गेम अड्ड्यावर हाणामारीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे हा अड्डा पोलिसांनी बंद केला होता. परंतु तो नव्याने सुरू झाल्याने या परिसरात हाणामारीच्या घटना पुन्हा घडत आहेत. हा पूल गेम अड्डा बंद करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.