दौंड : गेल्या काही वर्षांपूर्वी दौंड तालुक्यात कोणत्याही चांगल्या गोष्टी करताना एका गटाकडून दुसऱ्या गटावर कुरखोडया, राजकारण केले जाते असा आरोप व्हायचा. आता मात्र या आरोपांची जागा जातीवाद घेतो कि काय याची भीती वाटू लागली आहे. कारण आता सोशल मीडियावर विकास, अडचणी याची जागा धर्म वाद, जाती वादाने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याची प्रचिती गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडिया प्रकर्षाने जाणवू लागली असून सोशल मीडिया असो कि गाव कुटाणा कट्टा, सर्वत्र राजकीय चर्चाँची जागा जातीवादी चर्चाँनी घेतली असल्याचे पहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर असणाऱ्या अनेक ग्रुपवर शहाण्या सुर्त्यांकडून जातीवादाची ठिणगी पेरणारे मेसेज जणू जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे पहायला मिळत आहे. यातून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे आणि यातून निष्पन्न काय होणार हे त्यांनाच माहित. मात्र असे मेसेज टाकणारे शिकले सवरलेले लोकच जास्त पहायला मिळत असून वेळ पडल्यास अश्या या लोकांच्या जातीवादी पोस्टचे स्क्रिनशॉट पोलीस अधीक्षकांना देऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याची तयारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे.
सोशल मीडियावर आपल्या कुबुद्धितून अती हुशारीचे ज्ञान पाजळून काहीजण ठराविक जाती, धर्मांना टार्गेट करत असल्याच्या घटना राजरोसपणे घडू लागल्या आहेत. एका विशिष्ट समाजाप्रती द्वेष भावना तयार केली जात असून मनाला वाट्टेल तश्या प्रकारच्या पोस्ट आणि कमेंट पास केले जात आहेत. या प्रकरणांमध्ये अनेकवेळा गाव पुढारपणाची स्वप्ने पाहणाऱ्यांचा वरद हस्त जाणवत असून विविध जाती, धर्मात द्वेष भावना पसरवून दोन समाजात दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान सुरु असल्याची चर्चा नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.
अनेकवेळा खोटे नाटे आरोप करून काहींना मुद्दाम त्रास दिला जात असून काहीही झाले तरी त्रास द्या आणि दबावात ठेवा असले प्रकार काही गावांमध्ये सुरु असल्याचे समोर येत आहे. लोकांच्या सय्यमाची परीक्षा पाहिली जात असून दबाव तंत्रातून लोकांना बेजार करून वेठीस धरण्याचे प्रकार पहायला मिळत आहेत. अश्या कुरखोड्या बहाद्दरांवर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून वेळीच योग्य ती कारवाई न झाल्यास भविष्य काळात कुरखोडी बहाद्दर आणि सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची हिम्मत वाढून यातून भयंकर काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता नाही.