दौंड : दौंड शहरामधील एका खाजगी बँकेतील खात्यामध्ये पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा झाल्या असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बनावट नोटांच्या या भरण्यामुळे शहरात बनावट नोटा खपविणारे रॅकेट पुन्हा कार्यरत झाले आहे का अशी भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी शहरात बनावट नोटा खपविणाऱ्या रॅकेट मधील युवकांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहाजी कापसे (रा. देऊळगाव राजे, दौंड) यांच्या पत्नीच्या नावे येथील एका खाजगी बँकेत खाते आहे. दि.19 नोव्हेंबर रोजी या खात्यामध्ये (डिपॉझिट मशीन) शहाजी कापसे यांनी 27 हजार रुपयांचा भरणा केला. भरणा केल्यानंतर बँकेकडून येणारा पैसे जमा झाल्याचा संदेश त्यांना आला नाही. म्हणून कापसे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला ही बाब सांगितली. व्यवस्थापकाने लागलीच डिपॉझिट भरण्यासाठी असलेली मशीन उघडून पाहिले असता, कापसे यांनी भरणा केलेल्या रकमेपैकी 26 हजार 500 रु रुपयांच्या नोटा (बनावट) बाजूला असलेल्या दिसल्या. बनावट नोटा कापसे यांनी भरणा केलेल्या रुपयांपैकीच आहेत हे निष्पन्न झाले. त्यामुळे व्यवस्थापकाने या नकली नोटांबाबत कापसे यांना विचारले असता त्यांना ती रक्कम एका अज्ञाताने दिली असल्याचे कापसे यांनी व्यवस्थापकाला सांगितले.
व्यवस्थापकाने दौंड पोलीस स्टेशन ला ,अज्ञात इसमाने बँकेच्या खात्यामध्ये बनावट नोटांचा भरणा केल्याची तक्रार केली. दौंड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा. द. वि. कलम 489(ब) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँक व्यवस्थापकांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कशी काय तक्रार केली अशी चर्चा होत आहे.