दौंड शहराला 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक!

दौंड : अख्तर काझी

दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावामधील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने शहरातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पुढील फक्त दहा दिवस शहराला पाणीपुरवठा केला जाऊ शकतो इतकेच पाणी सध्या साठवण तलावामध्ये शिल्लक आहे अशी माहिती नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांनी दिली.

दौंड शहराला रोज 6 ते 7 एम एल डी पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या पाणी साठवण तलावामध्ये 75 ते 90 एम एल डी म्हणजेच दहा दिवस पाणीपुरवठा केला जाऊ शकतो इतकेच पाणी शिल्लक आहे असे चित्र आहे. नगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाण्याच्या मिळणाऱ्या आवर्तनासाठी 31 ऑक्टोबरलाच मागणी केलेली आहे. पूर्वी मागणी करताच आठ दिवसांमध्ये पाण्याचे आवर्तन मिळायचे, परंतु सध्या खडकवासला कॅनॉलच्या अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याने तसेच यंदा भरपूर पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाकडून सरकारकडे पाण्याची मागणी नाही.

त्यामुळे दौंड शहराला पाण्याचे आवर्तन मिळण्यास उशीर होत आहे असेही क्षीरसागर यांनी सांगितले. दौंड शहर व तालुक्याला पाटबंधारे खात्याकडून नियमित पाणी मिळावे म्हणून आमदार राहुल कुल नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत, यावेळीही दौंड शहराला वेळेत पाणी मिळावे म्हणून कुल यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा दौंडकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.