‘तू’ फक्त अहमदनगर जिल्ह्यातून जाऊनच दाखव! ‘या’ आमदाराचे मंत्री अब्दुल सत्तारांना थेट ‘आव्हान’

पुणे : अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यात जागोजागी निषेध आंदोलन करताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांसह आता राष्ट्रवादीचे आमदारही संतप्त झाल्याचे दिसत असून आमदार निलेश लंके यांनी तर मंत्री अब्दुल सत्तार यांना ‘तू’ फक्त अहमदनगर जिल्ह्यातून जाऊनच दाखव, तुझ्या गाड्या नाही फोडल्या मग बघ असा दमच त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना दिला आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळ नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली.  यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घराची तोडफोड करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटकही केली आहे.

याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांनीही मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा जाहीर निषेध केला असून त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

महिला राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे