दौंड शहरात अल्पवयीन मुलाचा ‘अपघाती’ मृत्यूनंतर दौंड वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको, अपघातास कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्ग रस्त्यावरील गोवा गल्ली परिसरात युवकाच्या अंगावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनुश जाधव (वय 14,रा. गोवा गल्ली, दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सदरच्या अपघातास दौंड नगरपालिका, अष्टविनायक मार्ग रस्त्याचे काम करणारा ठेकेदार व स्थानिक पोलीस प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करीत दौंड वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने घटनास्थळावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या अपघातास जे कोणी जबाबदार असतील अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात युवकाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचितचे दौंड तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी यावेळी केली. पक्षाच्यावतीने दौंड पोलिसांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी अजिंक्य गायकवाड, शिवा खरारे, बंटी वाघमारे, रितेश सोनवणे ,मयूर सोनवणे, सुमित सोनवणे, तुषार जाधव ,यश भालसेन, करण खांडे तसेच श्रीनाथ ननावरे आदी उपस्थित होते.

या निवेदनात, शहरातील गोवा गल्ली येथील अष्टविनायक मार्ग रस्त्यावरील चेंबर फुटून खड्डा झालेला आहे. ज्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी पक्षाच्या वतीने सदरच्या परिस्थितीबाबत दौंड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. त्यावेळेस नगरपालिकेकडून उडवा उडवी ची उत्तरे देण्यात आली. सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे व संबंधित ठेकेदाराचे आहे असेही सांगण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन घेऊन गेले असता त्यांनीही निवेदन स्वीकारले नाही. अष्टविनायक महामार्गाचे कार्यालय पुण्याला स्थलांतरित झालेले आहे अशी माहिती दिली गेली. शेवटी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कार्यालयाला निवेदन देण्यात आले. परंतु सगळ्याच अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने न घेतल्याने,दि.31 ऑक्टोबर रोजी(रात्री. 10 वा ) याच रस्त्यावर अपघात झाला व येथील अल्पवयीन मुलाला आपले प्राण गमवावे लागले. सदरचा अपघात याच वादग्रस्त चेंबरमुळे झाला आहे त्यामुळे संबंधित घटनेची सखोल चौकशी करून जो कोणी अधिकारी दोषी आहे त्याच्या विरोधात युवकाच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.