अख्तर काझी
दौंड : पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी दौंड येथे नवीन कॉल लाईन स्टेशन सुरू करण्यात आले आहे. हे स्टेशन सुरू झाल्यापासून वादातच आहे. रेल्वे प्रवाशां सह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही या स्टेशन परिसरात मारहाण करून लुटण्यात येत आहे.
दि.29 ऑक्टोबर रोजी रात्री उशिराच्या गाडीने उत्तर प्रदेशातून दौंडला कामानिमित्त आलेल्या प्रवाशांना कॉर्ड लाईन स्टेशन परिसरामध्ये चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कॉर्ड लाईन स्टेशनवर रात्रीच्या वेळेस उतरणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर वर येत आहे. याआधीही या स्टेशन परिसरामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना चोरट्यांनी मारहाण करून लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
या परिसरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत रेल्वे प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे वारंवारपणे तक्रार करण्यात आल्या आहेत, मात्र कोणत्याही प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नसल्याने प्रवाशांना मारहाण करून लुटण्याच्या घटनेत वाढच होत चालली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चोरट्यांच्या मारहाणीमध्ये एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासन जागे होणार आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. या स्टेशनवर फक्त रेल्वे प्रवाशांनाच नाहीतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आपला जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
सर्वच प्रकारच्या सुविधांचा या स्टेशनवर अभाव दिसतो आहे. प्रवाशांना दिली जाणारी सुविधा व त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घेतलीच पाहिजे अशी मागणी सुद्धा प्रवासी करीत आहेत.