पुणे : आपण आपल्या परिवारासह दिवाळी सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. या सणाचे औचित्य साधून अनेक सामाजिक संस्था ह्या समाजातील इतर घटकांचाही विचार करतात आणि समाजातील अश्या निराधार, गरीब, विशेष घटकाला सढळ हाताने मदत करून त्यांचाही आनंद द्विगुणित करतात.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असेच सामाजिक कार्य श्री.स्वामी शंकर प्रतिष्ठान पुणे शहर यांच्यावतीने राबविण्यात येत असून त्यांनी पुणे शहरात असणाऱ्या बावधन खुर्द येथील अनिकेत सेवा भावी संस्था संचलित विशेष मुलामुलींचे पुनर्वसन व निवासी आश्रमात जाऊन तेथील मुलांना फराळ व मिठाई वाटप केले. या आश्रमात मिठाई आणि फराळाच्या वाटपानंतर या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता. त्यांची दिवाळी आज या सामाजिक संस्थेने गोड केली आहे.