जग 3 ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिका – रशिया तणावात मोठी भर, नाटो चा ‘न्यूक्लिअर’ युद्धाभ्यास सुरु..

सहकारनामाअब्बास शेख

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir putin) यांनी काही दिवसांपूर्वी पाश्चात्य देशांवर ‘न्यूक्लियर ब्लॅकमेल’ (Nuclear War) चा आरोप केला होता आणि नाटो (NATO) चे काही मोठे नेते रशियाविरुद्ध अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देत असल्याचे ते म्हणाले होते. जर पाश्चात्य देशांनी अण्वस्त्रांच्या वापराबाबत आम्हाला ब्लॅकमेल केले तर रशियाही सर्व शक्तीनिशी प्रत्युत्तर देईल. आपल्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असे म्हणत पुतिन यांनी लष्कराची जमवाजमव करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करून न्यूक्लिअर युद्धाभ्यासाला सुरुवात केली.

नाटो च्या 14 देशांचा न्यूक्लीअर युद्धाभ्यास सुरु..

तर इकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) चा सर्वात मोठा सरावही सुरू करण्यात आला आहे. तसे पाहिले तर दरवर्षी होणारा हा आण्विक सराव आहे, जो युरोपातील देशांमध्ये केला जातो. मात्र यावेळी नाटोचा हा सर्वात मोठा युद्ध सराव दक्षिण युरोपमध्ये केला जात आहे. कोणत्याही अण्वस्त्र हल्ल्याला पूर्ण प्रत्युत्तर देण्याचे नाटोचे वचन सुनिश्चित करणे हा या सरावाचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र रशियासोबत सुरू असलेल्या तणाव आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर या सरावाला कूट नितीचा एक मोठा भाग म्हणून ओळखले जात आहे. नाटो म्हणते की हा एक नियमित आण्विक सराव आहे, परंतु उर्वरित जगासाठी ते युरोपमध्ये रशियाला जखडण्याची व्यूहरचना आखण्याचे एक साधन असल्याचे बोलले जात आहे. नाटो च्या या सरावामुळे विलक्षण अणुयुद्ध आणि तणाव वाढण्याची शक्यता आहे.

युक्रेन रशिया युद्धात ‘इराणी ड्रोन’ मुळे तणाव

गेल्या 8 महिन्यांपासून रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. या काळात रशियाने आपले हल्ले तीव्र करत युद्धात इराणचे घातक ड्रोन वापरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अमेरिकेने चेतावणी देताना, क्रिमियामध्ये इराणी सैनिक रशियन सैनिकांना युद्ध लढण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. व्हाइट हाऊसने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, रशियन सैन्याच्या मदतीसाठी क्रिमियामध्ये इराणी सैन्य पाठवण्यात आले होते. ते रशियन सैनिकांना ड्रोन चालवायला शिकवत आहेत. तेव्हापासून युक्रेनवरील हल्ले तीव्र झाले. वास्तविक, इराणने रशियाला कामिकाझे ड्रोन पाठवले आहेत. 4 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी कीव्हवर ड्रोनने हल्ला केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याचे संकेत मिळत आहेत.

17 ऑक्टोबर रोजी रशियाने इराणकडून खरेदी केलेल्या कामिकाझे ड्रोनने युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या कामिकाझे ड्रोनचे नाव शाहिद-136 असे होते. हे ड्रोन इराणचे सर्वात धोकादायक शस्त्र मानले जाते. या इराणी ड्रोनला आत्मघाती ड्रोन असेही म्हणतात. त्याचे वजन 200 किलो असून त्याची मारक क्षमता 2500 किमी आहे.

10 ऑक्टोबर रोजी रशियाने राजधानी कीव्हसह नऊ शहरांवर 83 क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता. केर्च ब्रिजवर झालेल्या स्फोटाचा बदला म्हणून रशियाने हा मोठा हल्ला केला. 8 ऑक्टोबर रोजी युक्रेनने रशियाचा केर्च ब्रिज उडवून दिला. हा पूल रशियाला क्रिमियाशी जोडतो.

रशियाच्या इशाऱ्यादरम्यान नाटो आण्विक युद्धाचा सराव

युक्रेनमधील वाढता युद्ध तणाव आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी सर्व उपलब्ध साधनांचा वापर करण्यास संकोच करणार नाही असा इशारा देऊनही, नाटो (NATO) ने प्रदीर्घ नियोजित असा आण्विक युद्ध सराव सुरु केला आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले की नाटो संघटना हा अणुयुद्ध सरावाचा कार्यक्रम पूर्ण करणार आहे.

या सरावामध्ये अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम लढाऊ विमानांचा समावेश असून यात सक्रिय असणारे बॉम्ब मात्र वापरण्यात आले नाहीत. नाटो देशांची सदस्य संख्या 30 असून या सरावात नाटो (NATO) चे 14 देश सहभागी झाले आहेत. या सरावाबाबत ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटोच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले कि, युक्रेनमधील युद्धामुळे आम्ही अचानक नियमित, दीर्घ-नियोजित सराव रद्द केला तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल आणि ते पूर्णपणे चुकीचे असेल त्यामुळे हा सराव सुरूच राहणार आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव घेईना

रशियन-युक्रेन युद्धाला (Russia – Ukraine War) आठ महिने होत असले तरी हे युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. एकीकडे युक्रेन माघार घेण्याऐवजी तगडे आव्हान देत आहे तर दुसरीकडे रशियासारख्या बलाढ्य देशाला युक्रेनकडून कडवी झुंज दिली जात असल्याने पुतिन यांच्यासाठीही ही वर्चस्वाची लढाई बनली आहे.
यातच क्रिमियातील पुलावर मोठा स्फोट झाल्यानंतर आता या युद्धाची व्याप्ती वाढली आहे. रशियाला क्रिमियाशी जोडणारा हा एकमेव पूल पुतिन यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. तोच उध्वस्त झाल्याने रशियाने झापोरिझियाच्या निवासी भागावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने यात 17 लोक मारले गेले आणि 40 हून अधिक लोक जखमी झाले.

रशिया-युक्रेन युद्धामुळे 3 ऱ्या महायुद्धाची भीती

रशिया – युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर आत्तापर्यंत रशियन सैन्याने पुतीन यांच्या आदेशाने युक्रेनमधील खेरसन, लुहान्स्क, दोनेस्तक आणि झापोरिझिया या चार प्रदेशांवर कब्जा केला आहे. मात्र सहज वाटणारा युक्रेन यात मोठे आव्हान उभे करताना दिसत आहे. त्यामुळे युक्रेन आता यात माघार घेईल असे दिसत नाही. त्यातच युक्रेन राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्वतः एक निवेदन जारी करत क्रिमिया ब्रिज ही फक्त सुरुवात असल्याचे सांगितले. त्यामुळे युक्रेन चे सर्व भाग पुन्हा मिळविण्यासाठी अजूनही असे मोठे हल्ले होतील असा कयास लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता रशिया कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला धडा शिकविण्यासाठी न्यूक्लीअर पॉवर चा वापर करू शकतो आणि त्याची सुरुवात ही इराणच्या घातक अश्या ड्रोन हल्ल्यांनी झाली आहे. इराणी ड्रोन आणि प्रशिक्षण देणारे इराणी सैन्य हे समीकरण जुळत असतानाच आता नाटो (NATO) चा न्यूक्लीअर युद्धाभ्यास आणि आणि त्यातून पडणारी एखादि किरकोळ ठिणगी ही 3 ऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते आणि त्यातून कित्येक देश यात ओढले जाऊन मोठा विनाश घडू शकतो यात शंका नाही.