मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या पत्रामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. ओला दुष्काळ जाहीर करताना खालील पैकी विविध पैलूही यात तपासले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रामध्ये, ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.
सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
पुढे त्यांनी, दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं अशी विनंती राज्यसरकारला केली आहे.
राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईतील पोट निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्या जागी उमेदवार देऊ नये अशी मागणी केली होती आणि त्यानंतर भाजपणे आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज माघेही घेतला होता त्यामुळे राज ठाकरे यांच्या ओला दुष्काळ या मागणीला महत्व प्राप्त झाले असून आता राज्यसरकार यावर काय निर्णय घेते याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.