अख्तर काझी
दौंड : अहमदाबादहून बेंगलोर ला जाणारी यशवंतपुर एक्सप्रेस उशिरा( अनिश्चित काळ) धावत असल्याचे कळाल्यानंतर या गाडीसाठी दौंड रेल्वे स्थानकात प्रतीक्षा करीत उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन करून आपला राग व्यक्त केला आहे.
दौंड रेल्वे स्थानकातून निघणारी म्हैसूर -साईनगर एक्सप्रेस ही गाडी संतप्त प्रवाशांनी स्थानकातच रोखून धरली. प्रवासी महिला ,लहान मुले, वृद्ध यांनी या गाडीसमोरच ठिय्या मांडला व आमच्या जाण्याचा बंदोबस्त होईपर्यंत आम्ही ही गाडी सुद्धा पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गोंधळ उडाला. या संतप्त प्रवाशांची विनवणी करता करता रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची पूरती दमछाक झाली.
एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद बेंगलोर एक्सप्रेस( यशवंतपुर एक्सप्रेस ) या गाडीने आपल्या गावी जाण्यासाठी जवळपास 200 प्रवाशांनी आपले रिझर्वेशन केलेले होते.
शिर्डीला दर्शनासाठी आलेल्या या प्रवाशांचा प्रवास कोपरगाव स्टेशन वरून होणार होता. परंतु सदरची गाडी उशिराने धावत असल्याचे, तसेच या गाडीचा मार्गही बदलला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच तुम्ही दौंडला जा तुमची गाडी दौंडला येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे प्रवासी खाजगी गाड्या करून दौंडला आले. परंतु दौंडला आल्यानंतरही त्यांची गाडी दौंड रेल्वे स्थानकात कधीपर्यंत येणार याचे उत्तर येथील संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडेही नव्हते असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण दिवस वाया जाऊन सुद्धा आपली गाडी कधी येणार हे रेल्वे अधिकारी यांना सुद्धा माहित नाही हे पाहून या प्रवाशांची सहनशीलता संपली व त्यांनी थेट रेल रोकोचाच पवित्रा घेतला.
या संतप्त प्रवाशांनी दौंड रेल्वे स्थानकातून निघण्याच्या तयारीत असलेल्या साईनगर- म्हैसूर एक्सप्रेस गाडी समोरच ठिय्या मांडला. तब्बल एक तास हे प्रवासी गाडीसमोर रुळावर बसून होते मात्र तोपर्यंत एकही रेल्वेचा जबाबदार अधिकारी त्यांची अडचण विचारण्यासाठी आला नाही. रेल्वे सुरक्षा दल पथक या ठिकाणी पोहोचले त्यांनी या प्रवाशांना खूप समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरते शेवटी स्टेशन प्रबंधक साहेबांना वेळ मिळाला व ते त्या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा तुमची नियोजित गाडी लोणावळा स्टेशन पर्यंत आलेली आहे जास्तीत जास्त दोन तासांनी तुमची गाडी या ठिकाणी येईल परंतु तुम्ही रोखून धरलेली गाडी पुढे जाऊ द्या असे समजाविले.
परंतु तरीही आंदोलक प्रवासी ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते, त्यांचा या रेल्वे अधिकाऱ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हा सर्व गोंधळ चालू असताना जी गाडी रोखून धरण्यात आली होती त्यामधील प्रवासी खाली उतरले व त्यांनी रेल रोको करणाऱ्या प्रवाशांशी हूज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. कारण जी गाडी संतप्त प्रवाशांनी रोखून धरली होती ती गाडी सुद्धा तब्बल 14 तास उशिराने धावत होती. त्या गाडीमधील ही प्रवासी पुरते वैतागलेले होते. त्यात पुन्हा आपलीच गाडी रोखून धरल्याने त्या प्रवाशांचाही पारा चढला. शेवटी पोलीस बलाचा वापर करून रेल रोको करणाऱ्या प्रवाशांना रुळावरून बाजूला करण्यात आले व साईनगर- मैसूर एक्सप्रेस अखेर मार्गस्थ झाली.