BIG NEWS… ‘वीज’ पडल्याने ‘केडगाव’ सब रजिस्ट्रार ऑफिससह परिसरातील ‘शेकडो’ संगणक जळाले! दिवसभर कामकाज ठप्प

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणक आणि अन्य यंत्र सामग्री वीज पडल्याने जळून निकामीझाली आहे. यात नुसते दुय्यम निबंधक कार्यालयच नाही तर येथे नोंदीचे कामकाज पाहणाऱ्या व्यक्ती, प्रॅक्टिस करणारे वकिल, स्टॅम्प व्हेंडर आणि इतरांचे शेकडो संगणक, प्रिंटर, निकामी झाल्याची माहिती मिळत आहे.

केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन संगणक संच, बी एस एन एल चा राउटर, स्विच, गेट वे, प्रिंटर, यू.पी.एस मशीन हे विजेच्या दाबाने जळाले असल्याची माहिती केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निबंधक शत्रुघ्न भोसले यांनी ‘सहकारनामा’ ला दिली आहे.

संगणक जळाले असल्याची ही बाब त्यावेळी लक्षात आली ज्यावेळी आज मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विजेचा प्रवाह सुरु झाला. मंगळवारी सकाळपासून लाईट नसल्याने अनेकजण आपले दस्त नोंदविण्यासाठी लाईन लावून उभे होते. लाईट आल्यानंतर ज्यावेळी संगणक आणि इतर वीज यंत्रे सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी कोणतेच यंत्र यास दाद देत नव्हते. ही काय भानगड आहे हे पाहण्यासाठी टेक्निशियनला बोलावण्यात आले त्यावेळी या कार्यालयासाभोवताली असणाऱ्या अनेक ऑफिसेसला सेम हाच प्रॉब्लेम होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा काय प्रकार आहे आणि सर्वांचेच संगणक व इतर उपकरणे का काम करत नसल्याने एकच गोंधळ माजला.

असा झाला खुलासा…

ज्यावेळी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये टेक्निशियन आले त्यावेळी त्यांच्या तपासणीत हे संगणक व इतर यंत्र सामग्री जळाली असल्याचे समोर आले. ही सम्पूर्ण यंत्र सामग्री विजेच्या उच्च प्रवाहामुळे जळून खाक झाल्याचे समजल्यानंतर मात्र सर्वांचेच धाबे दणाणले, कारण काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला होता आणि तो पाऊस पडत असताना या परीसरात जी वीज पडली होती त्याच्या प्रभावामुळे ही सारी उपकरणे जळून गेली होती.

मंगळवारी दुपार नंतर निसर्गाचा हा प्रकोप आल्यानंतर सब रजिस्ट्रार ऑफिसमधील अधिकारी, कर्मचारी तसेच साभोवताली असणारे छोटे मोठे दुकानदार, वकील मित्र आणि तेथील विविध ऑफिसमधील कर्मचारी हे निराश आणि हतबल झाल्याचे दिसत होते.