अब्बास शेख
संपूर्ण पुणे जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने याचा दळणवळणावर मोठा परीणाम झाला आहे.
अशीच परिस्थिती दौंड तालुक्यात झाली असून काल सायंकाळापासून पडत असलेल्या धो-धो पावसामुळे येथील ओढ्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. केडगाव, पारगाव, नानगाव, कानगाव, पाटस, राहू, यवत, वाखारी, वरवंड, दौंड, या तालुक्यातील महत्वाच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन काढणीला आलेली फुले, ज्वारी, बाजरी तसेच विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे ओढ्या नाल्यातील रस्ते, शिरूर सातारा या महामार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
शाळेला जाणाऱ्या मुलांचे यात मोठे हाल होत असून पुराच्या पाण्यातून त्यांना जीव मुठीत घेऊन शाळेला जावे लागत आहे. दौंड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून विविध भागांमध्ये मेघे गर्जनेसह पावसाचा जोर वाढून दोन गावांतील संपर्क तुटल्याने गावात आलेल्या आणि गावातून जाणाऱ्या लोकांना आसरा मिळेल तिथे रात्र जागून काढावी लागली आहे.
आमदार राहूल कूल यांकडून परिस्थितीचा आढावा…
दौंड चे आमदार राहुल कूल यांनी तालुक्यातील विविध गावांची माहिती घेऊन त्वरित मदतकार्य मिळण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
रयत क्रांती पक्षाची शासनाकडे मागणी…
सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील ऊस, कांदा, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, फळे, फुले आदी सर्वच शेतीमाल पावसाने पूर्णपणे खराब झाला आहे नष्ट झाला आहे. तसेच लम्पी आजारामुळे दूध उत्पादक शेतकरी सुद्धा प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. आता शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. तरी आपण केंद्र सरकारची मदत घेऊन केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल माफी करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी भानुदास शिंदे (प्रदेश अध्यक्ष, रयत क्रांती पक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.