दौंड : जुन्या शिरूर-सातारा हायवेवरील केडगाव-चौफुला या रस्त्याची अवस्था बिकट बनली असून पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा या रस्त्यावर महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दौंड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर यांनी दिला आहे.
योगिनी दिवेकर यांनी याबाबत माहिती देताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दुचाकीस्वार, पादचारी जीव मुठीत घेऊन त्या रस्त्याने प्रवास करत असतात. येता जाता कधी अपघात होईल याची शास्वती नाही. मला याचा स्वतः अनुभव आला असून शितोळे हॉस्पीटल समोर शनिवार संध्याकाळी 6 च्या दरम्यान एक वयस्क गृहस्थ खड्डे चुकविण्याच्या नादात माझ्या वाहनाला येऊन धडकले. त्यांना गाडी कंट्रोल न झाल्याने त्यांची माझ्या वाहनाला धडक बसली यात त्यांच्या पायला जबर मार लागल्याने त्यांना प्लास्टर करावे लागले.
हे सर्व प्रकार रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडत असून या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा दौंड महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या रस्त्यातील खड्डयांमध्ये लवकरच वृक्षारोपन करण्यात येईल असा इशारा योगिनी दिवेकर यांनी दिला आहे.