मुंबई : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांनी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याबाबत आक्षेप घेणाऱ्याला धमक्या दिल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. चेंबूर इथे एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने ही फिर्याद दिली आहे.
छगन भुजबळ यांच्यासह आणखी दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच संदर्भातील व्हिडीओ पाठवल्यानंतर धमक्या देणारे कॉल आल्याचे तक्रारदार ललितकुमार टेकचंदानी यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
टेकचंदानी यांनी जबाबात म्हटलं की छगन भुजबळ यांना दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले. त्यात शिवीगाळही केल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. टेकचंदानी यांनी म्हटलं की, मला आलेल्या मेसेजमध्ये तु भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या घालतो, दुबईची लोकं लावतो. साहेबांना मेसेज करणं महागात पडेल असं म्हटलं आहे.
दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांनीही एक ट्विट केलं असून चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी यांनी दिलेल्या धमकीमागे कोण आहे असा प्रश्न विचारत याला माजी मंत्र्यांचे समर्थन आहे का? धमकी कुणाच्या इशाऱ्याने दिली? अशी विचारणा केली आहे.