मुंबई : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावत असतो. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला शेती आणि पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल हे सातत्याने याबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी वेळ प्रसंगी थेट मंत्रालयात अधिकाऱ्यांना भिडून तातडीची बैठक घेत ते याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात हे विशेष.
पाणी प्रश्नावरून त्यांनी खडकवासला कालवा तसेच जलसंपदा विभागासंबंधित विविध समस्यांसंदर्भात मंगळवारी जलसंपदा विभागाचे प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ विलास राजपूत व पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांचे समवेत आज मंत्रालयात बैठक पार पडली, यावेळी आमदार राहुल कूल आणि अधिकाऱ्यांमध्ये विशेष चर्चा झाली. त्यामध्ये आ.राहुल कूल यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेडसावणारा पाणी प्रश्न आणि त्यावर असलेले उपाय आपल्या खास शैलीत मांडले.
त्यामध्ये मुळशी धरणाचे पाणी टप्याटप्याने पूर्वेकडे वळविण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीचे अहवाल व शिफारशी विचारात घेऊन त्यासंबंधी निर्णय प्रक्रिया गतिमान करण्यात यावी याबाबत याबाबत उभायंतांचे लक्ष वेधून घेतले.
खडकवासला धरणसाखळीतील नवीन व जुना मुठा उजवा कालवा अस्तरीकरण, पोटचाऱ्या व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे पूर्ण कारण्यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.
तसेच जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी या गावांतील योजनेमध्ये समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे यावर जोर दिला.
यंदा चांगला पाऊस झाल्याने खडकवासला साखळीतील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत पुणे शहराबरोबर, दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासाठी पिण्याचा व शेतीच्या पाण्यासाठी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी सूचित केले.
तर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे वापरलेले ज्यादा पाणी पुनर्प्रक्रिया करून सिंचनासाठी मिळावे, सांडपाणी शुद्धीकरणासाठी जायका प्रकल्प जायका सांडपाणी प्रकल्प कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्यात यावा ही मागणीही त्यांनी लावून धरली.